व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ncp political crisis : पार्थ पवारांची मुख्यमंत्र्यांशी गुप्त भेट, आनंद परांजपे थेट...

Ncp political crisis : पार्थ पवारांची मुख्यमंत्र्यांशी गुप्त भेट, आनंद परांजपे थेट सिल्व्हर ओकवर

 

ncp-political-crisis-parth-pawar-meets-devendra-fadnavis-anand-paranjape-at-silver-oak : अंतर्गत नाराजी, वाढत्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत वाढली धुसफूस

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी शिंदे गटात प्रवेश केलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील हालचालींना आणखी वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पार्थ पवार हे एकटेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते, अशीही माहिती समोर येत आहे.

Pm Narendra Modi : ऊर्जा संकट आणि जागतिक युद्धांच्या सावटामुळे विकास धोक्यात

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पक्षातील काही निर्णयांवरून मतभेद वाढल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व वृत्त फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विविध नेत्यांच्या हालचाली आणि बैठकींमुळे पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत आहेत. पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीनंतर आता राष्ट्रवादीतील काही नेते स्वतंत्र भूमिका घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Rashtrawadi Congress : इंधन बचतीसाठी सुटीच्या दिवशी शासकीय गाड्यांचा कौटुंबिक वापर रोखणार; राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट प्रशासनाला इशारा

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले आनंद परांजपे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी तिच्या राजकीय अर्थांबाबत चर्चा सुरू झाली आहे. आनंद परांजपे हे मूळचे शिवसैनिक होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत अनेक वर्षे पक्षात काम केले. पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Sandeep Joshi : ‘मला थांबायचे नाही…’ विधान परिषदेचा कार्यकाळ संपताच संदीप जोशींची सोशल मीडियावर नवी गुगली

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आनंद परांजपे यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीतील वाढत्या धुसफुसीदरम्यान परांजपे यांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली आता अधिक निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाजप आणि महायुतीतील इतर पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात पक्षातील काही नेते नवी राजकीय भूमिका घेणार का, तसेच राष्ट्रवादीत आणखी मोठे बदल होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!