Defence Corridor, GCC Hub Innovation Centres strengthen global identity : संरक्षण कॉरिडॉर, जीसीसी हब आणि नवोन्मेष केंद्रांमुळे जागतिक ओळख होणार बळकट
Mumbai: राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरणात पुण्याला आर्थिक विकासाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत पुण्यातील संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुण्यासाठी स्वतंत्र संरक्षण कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. याचबरोबर पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे म्हणजेच जीसीसीचे प्रमुख हब बनविण्यावर सरकारचा भर राहणार आहे.
राज्यातील अवकाश आणि संरक्षण उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी एकूण तीन संरक्षण कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश असलेला कॉरिडॉर महत्त्वाचा मानला जात आहे.
याशिवाय नागपूर, वर्धा, अमरावती, सावनेर आणि नाशिक, धुळे असे आणखी दोन संरक्षण कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहेत. विमानतळ, बंदरे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या जाळ्याच्या जवळीकतेचा विचार करून हे कॉरिडॉर निश्चित करण्यात आले असून, यामुळे राज्यातील अवकाश आणि संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,
पुणे हे राज्यातील प्रमुख निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाते. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित उत्पादन कंपन्या पुण्यात कार्यरत आहेत. या कंपन्यांच्या उत्पादनांची चाचणी आणि गुणवत्ता प्रमाणन पुण्यातच होण्यासाठी विशेष पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे उद्योगांना उत्पादनांच्या चाचणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यासाठी ‘नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबोरेटरीज’ अर्थात एनएबीएल मान्यताप्राप्त चाचणी व गुणवत्ता प्रमाणन प्रयोगशाळा पुण्यात स्थापन केली जाणार आहे. राज्यातील प्रमुख निर्यात समूहांमध्ये अशा प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, पुण्याची निवड करण्यात आल्याने शहराच्या औद्योगिक क्षमतेत भर पडणार आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर जागतिक क्षमता केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला जीसीसीचे अग्रगण्य केंद्र बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, त्यासाठी मुंबई आणि पुण्याला विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. या धोरणाअंतर्गत वेतन अनुदान, करसवलती, संशोधन व विकासासाठी सहाय्य, करकपात आणि भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे आगामी काळात पुण्यातील जीसीसी परिसंस्था अधिक विस्तारण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याला नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्यासाठी नवोपक्रम व नवोन्मेष हब स्थापन करण्याचा निर्णयही या धोरणात घेण्यात आला आहे. पुणे महानगर किंवा नवी मुंबई परिसरात सुमारे १०० एकर जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून कृत्रिम प्रज्ञा, ब्लॉकचेन, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आघाडीच्या क्षेत्रांतील स्टार्टअप्स, इनक्युबेटर, ॲक्सिलरेटर आणि संशोधन व विकास केंद्रांना पाठबळ दिले जाणार आहे. या केंद्रात नवोन्मेष प्रयोगशाळा, टेक पार्क आणि आधुनिक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे धोरणात नमूद करण्यात आले आहे.
नवीन उद्योग धोरणामुळे पुण्याचे औद्योगिक आणि आर्थिक महत्त्व आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर संरक्षण कॉरिडॉर, एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि जीसीसी हब यांसारख्या उपक्रमांमुळे पुणे परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला मोठी चालना मिळेल. तंत्रज्ञानाचा स्वीकार उद्योगांमध्ये वाढणार असून, जागतिक पातळीवर संरक्षण उत्पादन, नवोन्मेष आणि जीसीसी केंद्र म्हणून पुण्याची ओळख अधिक भक्कम होणार असल्याची प्रतिक्रिया उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे.








