व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nitin Raut : बोलू न दिल्याने नितीन राऊत संतापले; महानिर्मितीच्या खाजगीकरणाचा केला...

Nitin Raut : बोलू न दिल्याने नितीन राऊत संतापले; महानिर्मितीच्या खाजगीकरणाचा केला आरोप

Nitin Raut alleges of privatisation of Mahavitaran, attacks on CM Devendra Fadnavis : सरकारी वीज संस्था खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू असल्याची टीका

Nagpur राज्यातील वीज दरवाढीच्या गंभीर मुद्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना बोलू न दिल्याने माजी ऊर्जामंत्री व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत चांगलेच भडकले. जनतेच्या कष्टाच्या पैशातून उभी राहिलेली सरकारी वीज संस्था खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे हे कारस्थान महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांनी मुख्यमंत्री तसेच विद्यमान ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पावसाळी अधिवेशनादरम्यान डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा बुरखा फाडत सरकारवर सडकून टीका केली.

महानिर्मितीचे १६०० मेगावॅटचे वीज संच मुदतीपूर्वी बंद करून, त्याचा फायदा खाजगी भांडवलदारांना पोहचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी आज विधिमंडळात केला. डॉ. राऊत यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यानुसार, अदानी पॉवरकडून १६०० मेगावॅट वीज खरेदीला सरकारने दिलेली मंजुरी ही अत्यंत संशयास्पद आहे.

Sudhir Mungantiwar : गोमातेच्या संरक्षणासाठी मुनगंटीवारांची तळमळ; राज्यमंत्री म्हणाले, ‘कायदा आणखी कडक करणार’

जनतेच्या पैशातून उभारलेले भुसावळ, खापरखेडा, नाशिक आणि चंद्रपूर येथील १० महत्त्वाचे वीज संच २०३० पूर्वीच बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महानिर्मितीची यंत्रणा सक्षम असताना हे संच बंद करण्याचा सरकारचा आत्मघातकी निर्णय कोणाच्या फायद्यासाठी आहे, असा थेट सवाल उपस्थित करत या निर्णयामागे खाजगी भांडवलदारांचे उखळ पांढरे करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

या खाजगीकरणाच्या प्रक्रियेमुळे राज्यातील १४ हजाराहून अधिक कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर गदा येणार आहे. तसेच सामान्य वीज ग्राहकांना भविष्यात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असून, त्यांना वीज दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. सध्या स्मार्ट मीटर आणि इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली सामान्य ग्राहकांची लूट होत आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Sudhir Mungantiwar : धान उत्पादकांना हेक्टरी २० हजारांची प्रोत्साहनपर मदत द्या; विधानसभेत मुनगंटीवारांचा आग्रह

‘गुजरात मॉडेल’चे गोडवे गाणाऱ्या सरकारने महाराष्ट्रातील सरकारी वीज संस्थांचे खच्चीकरण करून संपूर्ण ऊर्जा क्षेत्र खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा आत्मघातकी डाव त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केली. आता या गंभीर आरोपांवर सरकार काय ठोस भूमिका घेते, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!