व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Raj Thackeray : ‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा अपमान कसा?’

Raj Thackeray : ‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा अपमान कसा?’

raj-thackeray-questions-devendra-fadnavis-over-missing-link-controversy-and-development-claims : राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल, विकासाच्या दाव्यांवरही निशाणा

Mumbai : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र झाला असून, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान कसा होतो, असा थेट सवाल करत त्यांनी सरकारवर विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुंबईतील मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मिसिंग लिंक प्रकल्पावर राजकारण करू नये, असे आवाहन केले. मात्र, विरोधात असताना भाजपने विविध प्रश्नांवर आंदोलने केली आणि सरकारवर सातत्याने टीका केली होती. त्यावेळी ते राजकारण नव्हते का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्तेत आल्यानंतर टीका सहन होत नसल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्र्यांनी “माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राचा अपमान करू नका” असे विधान केल्याचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न विचारल्याने महाराष्ट्राचा अपमान होत नाही. लोकशाहीत नागरिकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. केंद्र सरकारवर टीका केली तर देशविरोधी आणि राज्य सरकारवर टीका केली तर महाराष्ट्रविरोधी ठरवण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारवर टीका करणाऱ्यांना इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरही राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री म्हणून संयमाने उत्तर देण्याऐवजी “बघून घेऊ” अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. विधानसभेत मराठी आमदारांसमोर मुख्यमंत्री अचानक हिंदीत का बोलू लागले, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे वक्तव्य नेमके कोणासाठी होते, असा सवाल करत त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा दावाही केला.

Vijay wadettiwar : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांपासून मोशी दुर्घटनेपर्यंत सरकारला घेरले !

मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, प्रकल्पाचे उद्घाटन १ मे रोजी झाले आणि अवघ्या दोन महिन्यांत बोगद्यात पाणी झिरपू लागले तसेच परिसरात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. उद्घाटनावेळी आधुनिक तंत्रज्ञान आणि परदेशातून आणलेल्या साहित्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासाच्या नावाखाली राज्यात अनियोजित बांधकामे सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि मोठे प्रकल्प उभारणे म्हणजे विकास नसून शहरांचे नियोजन, सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यालाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील वाढत्या बांधकामांमुळे नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी राज ठाकरे यांनी कंत्राट प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही कंत्राटदारांकडून कंत्राटाच्या रकमेतील मोठा हिस्सा विविध स्तरांवर द्यावा लागतो, अशी चर्चा असल्याचा उल्लेख करत त्यांनी अशा परिस्थितीत दर्जेदार कामाची अपेक्षा कशी करायची, असा सवाल उपस्थित केला.

Tawde khadse meeting : विनोद तावडे – एकनाथ खडसे भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता विरोधी पक्षांसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतल्याने हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. सरकारकडून या टीकेला काय उत्तर दिले जाते आणि प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!