व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Orders to officers : सर्व अधिकार्‍यांना फिल्डवर राहण्याचे आदेश !

Orders to officers : सर्व अधिकार्‍यांना फिल्डवर राहण्याचे आदेश !

Rain havoc; Chief Minister reviews relief work ; पावसाचा कहर; मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याचा आढावा

Mumbai : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नद्या-नाल्यांना पूर आला असून शेतशिवारात व घरांमध्ये पाणी घुसले आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील २८५७ गावांत शेती बाधित झाली असून ९० जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची मदत घ्यावी लागली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून मदतकार्याची माहिती जाणून घेतली. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा योग्यरित्या उपलब्ध ठेवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. काही भागांत चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. धरणांचा विसर्ग वाढत असताना नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यावर विशेष भर द्यावा, असंही त्यांनी सांगितलं. सर्व अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून मदतकार्यात सहभागी व्हावेत, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला.

Shivsena: उद्धव ठाकरेंनी केलं सांत्वन; शिंदेंनी थेट मदत पोहोचवली !

फडणवीसांनी जलसंपदा विभागाकडून धरणांच्या विसर्ग स्थितीचा आढावा घेतला. जायकवाडी प्रकल्पात झालेल्या 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक विसर्ग सुरू असून तो दीड लाख क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. माजलगाव धरणातून सध्या 41,701 क्युसेक विसर्ग होत आहे, तर उजनी धरणातून एक लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्रकडे सरकल्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत 200 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Financial status : महाराष्ट्राची आर्थिक ताकद थक्क करणारी!

राज्यातील वाढत्या पूरस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले असून मदतकार्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत.

error: Content is protected !!