maharashtra-pocso-crime-rise-political-pressure-over-nasrapur-case : सरकारसमोर कायदा-सुव्यवस्थेचं सर्वात मोठं आव्हान
Mumbai : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना राज्यातील वाढत्या पोक्सो गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात दर ५३ मिनिटांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असल्याचे वास्तव अधिकृत आकडेवारीतून उघड झाले असून, महिला आणि बाल सुरक्षेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आता तीव्र राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला आहे.
मागील वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल १० हजार १३१ पोक्सो गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर १ जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीतच राज्यात १३ हजार ४१० गुन्हे दाखल झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच ३ हजार २७९ गुन्हे नोंदविले गेले असून, दररोज सरासरी २७ चिमुकल्या अत्याचाराच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र आहे. या वाढत्या घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि बालसंरक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या संपूर्ण आकडेवारीत पुणे जिल्हा सर्वाधिक संवेदनशील ठरला असून येथे १ हजार ७३६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे येथे १ हजार ५९३, नाशिक येथे ६१४, सोलापूर येथे ५८४ आणि नागपूर येथे ५५८ गुन्हे दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२३, कोल्हापूरमध्ये ३१५, जळगावमध्ये २९०, साताऱ्यात २७६ आणि चंद्रपूरमध्ये २५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातही परिस्थिती चिंताजनक असल्याचे गडचिरोली, नंदुरबार, हिंगोली आणि सिंधुदुर्गमधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
नसरापूर प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी सहा अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन केले असून त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडत, “माझ्या मुलीला खरा न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला फाशी होईपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी माझ्या घरी येऊ नये,” अशी विनंती केली आहे. त्यांच्या या भूमिकेने समाजमन हेलावून गेले असून राजकीय सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष न्यायाची अपेक्षा असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगानेही नसरापूर येथील घटनेचा तीव्र निषेध करत राज्य सरकारकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. वाढत्या पोक्सो गुन्ह्यांमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधकांनीही सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कायद्याची भीती उरली आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Khamgao Politics : डिवरेंचे ‘चॅलेंज’ चर्चेत; खामगावात शिंदेसेनेचा दावा, महायुतीत खळबळ
राज्यातील पोक्सो गुन्ह्यांची वाढती संख्या केवळ आकडेवारी राहिलेली नसून ती समाजाच्या नैतिक अधःपतनाची धोकादायक घंटा मानली जात आहे. कठोर कायदे, जलद न्यायव्यवस्था आणि सामाजिक जागरूकता याशिवाय या विकृत मानसिकतेवर नियंत्रण मिळवणे अशक्य असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.








