pratap-sarnaik-marathi-compulsory-auto-taxi-driver-license-cancel-maharashtra : प्रताप सरनाईकांचा ‘मग्रुरी मोडून काढण्या’चा इशारा
Mumbai : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या मुद्दा आता अधिक कठोरपणे लागू करण्याची तयारी परिवहन विभागाने केली आहे. रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असून, नियमांचे पालन न केल्यास परवाना निलंबित करण्यापासून कायमस्वरूपी रद्द करण्यापर्यंतची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांमध्ये आवश्यक बदल करून या तरतुदींची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या चालकांना प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधता यावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
प्रस्तावित नियमांनुसार, एखाद्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठीचे जुजबी किंवा व्यवहारिक ज्ञान नसल्याचे आढळल्यास त्याला थेट परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार नाही. संबंधित चालकाला मराठी शिकण्यासाठी प्रथम एक महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे.
Desai Vs Mhaske : अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले, नेमकं काय घडलं?
या कालावधीतही चालकाने मराठी शिकली नाही किंवा नियमांचे पालन केले नाही, तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यानंतरही चालकाने आवश्यक भाषिक पात्रता पूर्ण केली नाही, तर त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची तरतूद यापूर्वीपासूनच कायद्यात आहे. मात्र, या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आता त्याकडे कठोरपणे लक्ष दिले जात आहे.
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, चालकांना अचानक कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून त्यांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. सरकारच्या सूचनेनंतर अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली असून, काही चालकांनी मराठी आत्मसात केली आहे.
मात्र, अजूनही काही चालकांकडून ‘मराठी शिकणार नाही’ अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याचा दावा सरनाईक यांनी केला. नियम सर्वांसाठी समान असून, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर राज्याच्या अधिकृत भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मराठी भाषेच्या नियमाची अंमलबजावणी करण्यामागे कोणावर अन्याय करण्याचा हेतू नसल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘मराठी शिकणार नाही’ अशी भूमिका घेणाऱ्या चालकांची मग्रुरी मोडून काढण्यासाठीच कायद्यात सुधारणा करण्यात येत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नव्या नियमांनंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या भाषिक पात्रतेची तपासणी अधिक गांभीर्याने होण्याची शक्यता आहे.
परिवहन विभागाने मोटार वाहन नियमांमधील संबंधित नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने आणि मीटर असलेल्या कॅब चालविण्यासाठी नवीन परवाना देताना तसेच जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करताना चालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक करण्याचा प्रस्ताव आहे.
यामुळे भविष्यात परवाना प्रक्रियेतच चालकाच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. फेरतपासणीच्या वेळीही चालकाला प्रवाशांशी मराठीत व्यवहार करता येतो का, याची तपासणी केली जाऊ शकते.
रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या प्रक्रियेत स्थानिक रहिवासी असल्याचे दाखवण्यासाठी काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनीही यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती आहे.
काही परप्रांतीय तसेच परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनातील काही घटकांच्या संगनमताने कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर चालकांची पात्रता, कागदपत्रे आणि भाषिक ज्ञान यांची तपासणी करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर दणका!
दरम्यान, मराठी भाषेच्या सक्तीच्या नव्या नियमांमुळे महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी परवाना प्रक्रिया अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान सिद्ध करावे लागू शकते.








