7/12 extract discontinued; official Property Cards to be issued, major relief for residents in newly expanded municipal limits : शहरातील मालमत्तांचा नवा दस्तऐवज; प्रॉपर्टी कार्डमुळे कर्ज व व्यवहार होणार सुलभ
Buldhana नगरपालिका हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झालेल्या गावांतील हजारो भूधारकांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हद्दवाढ क्षेत्रातील जमिनींसाठी वापरले जाणारे पारंपरिक सातबारा उतारे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी संबंधित मालमत्ताधारकांना अधिकृत प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मालकी हक्काची नोंद अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम होणार आहे.
शहराचा विस्तार वाढत असताना हद्दवाढ भागातील जमिनींचा वापर शेतीपेक्षा निवासी व व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कृषी जमिनींसाठी असलेली सातबारा प्रणाली नागरी क्षेत्राच्या गरजांना पूरक राहत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने संपूर्ण क्षेत्राची नोंद नगर भूमापन विभागाच्या अभिलेखात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूल व भूमी अभिलेख विभागाकडून हद्दवाढ क्षेत्रातील भूमापनाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर नागरिकांना डिजिटल स्वरूपातील प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहे. काही भागांत या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा मालमत्ताधारकांना बँक कर्ज मिळविताना होणार आहे. हद्दवाढ भागातील अनेक नागरिकांना सातबारा उताऱ्यांच्या आधारे गृहकर्ज किंवा व्यावसायिक कर्ज मंजूर करून घेण्यासाठी अडचणी येत होत्या. प्रॉपर्टी कार्डमुळे मालकी हक्काची स्पष्ट नोंद उपलब्ध होणार असल्याने कर्ज प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
प्रॉपर्टी कार्डमध्ये मालमत्तेचे अचूक क्षेत्रफळ, मूळ मालक व भोगवटादारांची माहिती, त्यांच्या हिश्श्याची नोंद तसेच मालमत्तेवरील बँक कर्ज किंवा इतर बोजांची माहिती स्पष्टपणे नमूद केली जाते. त्यामुळे मालमत्तेचे व्यवहार, वारस नोंदी आणि न्यायालयीन किंवा शासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत आणि निर्विवाद दस्तऐवज मिळणार असून, शहरातील मालमत्ता व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होणार असल्याचे मानले जात आहे.








