Dr. Rajeev Potdar Wins by 552 Votes, Securing Victory After Swinging 100 Votes from the Maha Vikas Aghadi : अतुल लोंढेंना अवघी 130 मते, हक्काची मतेही राखता आली नाहीत
Nagpur नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजप-महायुतीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी तब्बल ५५२ मते मिळवून विक्रमी विजय संपादित केला आहे, तर काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांना अवघ्या १३० मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीच्या धक्कादायक आकडेवारीवरून, डॉ. पोतदार यांनी महाविकास आघाडीची तब्बल १०० हून अधिक मते फोडल्याचे स्पष्ट झाले असून, लोंढे यांना आघाडीची हक्काची मतेही राखता आली नसल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात आधीपासूनच महायुतीचे पारडे जड होते. हे पाहता, निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला उगाच पैसा आणि वेळेचा अपव्यय न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, काँग्रेसने हा सल्ला फेटाळत आपले मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले. निवडणुकीच्या गणितानुसार, भाजपकडे स्वतःची ५०४ आणि महायुतीची मिळून एकूण ५८२ मते होती; तर महाविकास आघाडीकडे २४३ मते होती. याशिवाय मुस्लिम लीग, एमआयएम आणि बसपाची ११ मते होती, ज्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. भाजपने बुटीबोरीतील २० नगरसेवकांना आधीच आपल्या गोटात खेचले होते, तरीही काँग्रेस नेत्यांना ‘चमत्काराची’ आशा होती.
Avinash brahmankar: भाजपचे ब्राह्मणकर विजयी; मात्र महायुतीची मते फुटल्याचीच अधिक चर्चा
अतुल लोंढे यांना महाविकास आघाडीची किमान २०० मते मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ती पूर्णपणे फोल ठरली. भाजपने ‘ऑपरेशन’ करत आघाडीची १०० मते आपल्याकडे खेचली आणि लोंढे यांचा दारुण पराभव झाला. नागपूर महापालिकेत काँग्रेसचे ३३ नगरसेवक असतानाही लोंढे यांना मिळालेली कमी मते पाहता, ग्रामीण भागातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, निकालानंतर पराभव स्वीकारताना अतुल लोंढे म्हणाले की, संख्याबळ पाहता निकाल काय लागणार हे आम्हाला आधीच ठाऊक होते, पण आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढलो; भाजपने सत्ता आणि पैशाच्या ताकदीवर मतदारांची खरेदी केली.








