rajya-sabha-election-2026-navneet-rana-sunetra-pawar-meeting-chhagan-bhujbal-candidature : छगन भुजबळांच्या उमेदवारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
Mumbai : सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ही जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या अचानक झालेल्या हालचालींमुळे राज्यसभा निवडणुकीचे राजकारण अधिकच रंगतदार बनले आहे.
रविवारी सकाळी नवनीत राणा यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा स्वतःकडे ठेवणार की महायुतीतील दुसऱ्या पक्षासाठी सोडणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
यापूर्वी शनिवारी छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीत राज्यसभेची उमेदवारी आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य बदल यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
Cylinder price hike : महागाईच्या झळा तीव्र, घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा महागले !
सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर निवड झाल्यास मंत्रिपदाचा कार्यभार त्यांच्या पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अट घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यात समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिल्यानंतरच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची त्यांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. या अटीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा रखडल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांच्या नावाला तत्त्वतः मान्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, मंत्रिपदाबाबतचा पेच कायम असल्यामुळे उमेदवारीची घोषणा अद्याप प्रलंबित आहे. अशातच नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
Praful gudadhe: भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी उघडले, मुलगा म्हणून शटर मीच बंद करणार
महायुतीतील अंतर्गत समीकरणे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यांचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या रिक्त जागेवर छगन भुजबळ यांचीच वर्णी लागणार की अखेरच्या क्षणी नवे समीकरण पुढे येणार, याचे उत्तर पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या घडामोडींमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून राज्यसभा निवडणूक पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.








