RPI won’t contest legislative election, but will claim for the g quota place : निवडणूक जिंकण्यासाठी संख्याबळ नसल्यामुळे दावा टाळल्याचे केले स्पष्ट
Nagpur नागपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ४० ते ५० सदस्य असून विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी एवढे संख्याबळ पुरेशे नाही, त्यामुळे आम्ही महायुतीकडे या जागेची मागणी केलेली नाही, अशी स्पष्टोक्ती आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, संख्याबळ नसले तरी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला मिळालीच पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एक जागा देण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा करत आठवले यांनी महायुती सरकारमध्ये आरपीआयला सन्मानजनक सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, असे ठासून सांगितले. महामंडळ वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मते रिपब्लिकन पक्ष हा भाजपच्या कोट्यात आहे, त्यामुळे भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी किमान १ ते २ महामंडळे आम्हाला मिळायला हवीत आणि मुख्यमंत्री आम्हाला किमान एक तरी महामंडळ नक्की देतील अशी आमची अपेक्षा आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना आठवले यांनी, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जागृत केले असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, सरसकट आरक्षण मिळणे शक्य नसून ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत, त्यांनाच ते मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, पण यातून आता सुवर्णमध्य शोधणे आवश्यक असून हे आंदोलन फार काळ ताणले जाऊ नये; यासाठी मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यात एक सकारात्मक बैठक होऊन यावर तात्काळ मार्ग काढण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाज नाराज नाही असे स्पष्ट करत आठवले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सर्व जातींना न्याय देणारे नेते आहेत. महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे, त्यामुळे मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे या चर्चेत तथ्य नसून फडणवीस हे मराठा समाजाला न्याय देण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. शेवटी, मोदी सरकारच्या आर्थिक आरक्षणाचा दाखला देत, ज्या जाती-जमातींना अद्याप आरक्षण मिळत नव्हते आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे, त्यांना मोदी सरकारने ‘EWS’ अंतर्गत आरक्षण देऊन आधीच मोठा दिलासा दिला असल्याचेही आठवले यांनी यावेळी नमूद केले.








