व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ravikant tupkar : सरसकट कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न,...

Ravikant tupkar : सरसकट कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबारे आणि सोयाबीन-कापूस उधळला

Ravikant tupkar aggressive for farmers loan waiver, stages protest at vidhan bhavan : कार्यकर्त्यांसह अचानक झाले दाखल, सुरक्षा यंत्रणेची धावपळ

Mumbai राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनासमोर अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह थेट विधानभवनाच्या दिशेने धडकले. त्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करत सातबाऱ्यांच्या प्रती मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने भिरकावल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा तीव्र निषेध केला.

या अचानक झालेल्या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ झाली.
विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही, रविकांत तुपकर प्रमुख कार्यकर्त्यांसह अचानक मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, सरकारने दिलेला शब्द पाळावा अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वेढले व ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले.

Sudhir Mungantiwar : गोमातेच्या संरक्षणासाठी मुनगंटीवारांची तळमळ; राज्यमंत्री म्हणाले, ‘कायदा आणखी कडक करणार’

या आक्रमक आंदोलनाला गेल्या महिन्यातील अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. १५ ते १९ जूनदरम्यान बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्याने राज्यभरात रास्तारोको, जाळपोळ आणि आत्मदहनाचे प्रयत्न झाले होते. या तीव्र संतापानंतर राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत शेतकरी प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर तुपकरांनी आंदोलन स्थगित केले होते; मात्र अनेक दिवस उलटूनही सरकारने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर हा संतापाचा स्फोट झाला. या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

error: Content is protected !!