Ravikant Tupkar turns aggressive over the loan waiver issue; demans for a blanket farm debt waiver : कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक; सरसकट कर्जमुक्तीसाठी संघर्ष तीव्र करण्याचा इशारा
Jalgao Jamod राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून त्यातील जाचक अटींमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी जळगाव जामोद येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केले.
आंदोलनादरम्यान बोलताना रविकांत तुपकर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी त्यात इतक्या अटी-शर्ती लादण्यात आल्या आहेत की, राज्यातील दहा ते पंधरा टक्के शेतकरीसुद्धा पात्र ठरणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका त्यांनी केली.
केंद्र सरकारने मोठ्या उद्योगसमूहांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज कोणत्याही अटींशिवाय राईट ऑफ केले, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत कठोर निकष लादले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला सरसकट कर्जमुक्ती देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे तुपकर म्हणाले.
Harshwardhan Sapkal : हायकमांड खुश, मग नाराज कोण?; सपकाळांवरून काँग्रेसमध्ये कुजबुज
सरसकट कर्जमुक्ती, संपूर्ण सातबारा कोरा करणे आणि शेतमालाला हमीभाव देणे या मागण्यांसाठी राज्यव्यापी संघर्ष उभारण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जळगाव जामोद येथून या आंदोलनाची सुरुवात होत असून आगामी काळात महाराष्ट्रभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तुपकर यांनी पीकविमा, नुकसानीचे पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नावरही प्रशासनावर टीका केली. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वारे व पावसामुळे केळी, संत्रा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिकांच्या घरांचे व शेडचेही नुकसान झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नुकसानग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत आणि प्रभावित शेतकरी व नागरिकांना शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी करून संबंधित अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
Rohit pawar : ‘आम्हीही जिद्दी आहोत, आता माघार नाही’; सरकारशी चर्चेच्या फेऱ्या सुरू
दरम्यान, आंदोलनादरम्यान तुपकर यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, प्रशासनाकडे निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे कर्जमाफी, पीकविमा आणि नुकसानभरपाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आगामी काळात या मुद्द्यांवर राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








