home-department-restrictions-on-protests-in-mumbai-before-manoj-jarange-and-laxman-hake-agitation : मुंबईत आझाद मैदानाशिवाय आंदोलनास बंदी, शनिवार-रविवारी परवानगी नाही
Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रस्तावित आंदोलनांपूर्वी राज्याच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आझाद मैदान वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा किंवा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच आझाद मैदानातही केवळ एक दिवस, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच आंदोलन करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे जरांगे आणि हाके यांच्या आंदोलनांवर या नव्या नियमांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथे निर्णायक आंदोलनाची हाक दिली असून, आवश्यकतेनुसार मुंबईत धडकण्याचा इशाराही दिला आहे. दुसरीकडे, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने तातडीची अधिसूचना जारी करत आंदोलनांसाठी नवे नियम लागू केले आहेत.
गृह विभागाच्या आदेशानुसार, आझाद मैदान हेच आंदोलनांसाठी अधिकृत ठिकाण राहणार आहे. मुंबईतील अन्य कोणत्याही भागात मोर्चे, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच आंदोलकांना मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प परिसर यांसारख्या भागांमध्ये प्रवेश किंवा जमाव करण्यासही निर्बंध लागू राहणार आहेत.
आझाद मैदानात आंदोलनासाठीही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. एका दिवसापेक्षा अधिक काळ आंदोलन करण्यास परवानगी नसणार असून सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या कालावधीतच आंदोलन करता येईल. निर्धारित वेळेनंतर मैदानात थांबणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे २९ ऑगस्ट हा शनिवार असल्याने जरांगे यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनावर या नियमांचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Mla Report Card : आमदारांच्या प्रगतीपुस्तकात काँग्रेसचा दबदबा
गृह विभागाने आंदोलनांसाठी आणखी काही कठोर अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार एका आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार आंदोलकांना परवानगी असेल. आंदोलकांनी आझाद मैदानातच जमावे आणि आंदोलन संपल्यानंतर तेथूनच शांततेत पांगावे, अशी अट घालण्यात आली आहे.
तसेच ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्या, सायकली, रिक्षा, हातगाड्या आणि जड वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी नसेल. नऊ बाय सहा फुटांपेक्षा मोठे बॅनर किंवा झेंडे वापरता येणार नाहीत. झेंड्यांच्या काठ्या दोन फुटांपेक्षा मोठ्या असू नयेत, अशी अट घालण्यात आली आहे.
याशिवाय, आंदोलनस्थळी तंबू किंवा मंडप उभारण्यास मनाई करण्यात आली असून लाठ्या, तलवारी, भाले किंवा इतर शस्त्रांसह येण्यासही सक्त बंदी असेल. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराजे देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगे यांनी आंदोलनावर ठाम भूमिका कायम ठेवली आहे.
लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह विभागाने ही तातडीची अधिसूचना जारी केल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मुंबईतील आंदोलनांचे स्वरूप बदलण्याची शक्यता असून, भविष्यातील मोर्चे आणि आंदोलने आता केवळ आझाद मैदानापुरतीच मर्यादित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








