₹20,000 bribe demanded for the original copy of a mutation cancellation order : मेहकर उपविभागीय कार्यालयात वाशिम एसीबीची धडक कारवाई ; एसीबीची जिल्ह्यात सलग दुसरी कारवाई
Mehkar घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे खाणारा कंत्राटी अभियंत्यानंतर सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यात लाचखोर अधिकार्यावर कारवाई करण्यात आली. फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी २० हजारांची लाच घेणार्या सहाय्यक महसूल अधिकारी कैलास भगवान मुरकुट (वय ४६) यास वाशिम एसीबीने गजाआड केले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास मुरकुट हे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर येथे सहाय्यक महसूल अधिकारी तथा प्रस्तुतकार-१ म्हणून कार्यरत आहेत. ते बालाजी नगर, प्लॉट क्रमांक ४९, मेहकर येथे वास्तव्यास आहेत. या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांच्या पक्षकाराच्या (नात्याने चुलत आजोबा) जमिनीच्या फेरफार रद्द प्रकरणातील कायदेशीर बाबींसाठी त्यांच्याकडे वकीलपत्र होते.
Vidarbha Farmers : विमा कंपनीकडून तुटपुंजी मदत, बुलढाण्यात शेतकरी संतप्त
या संदर्भातील अपीलावर २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम आदेश झाला होता. मात्र, त्या अंतिम आदेशाची मूळ नक्कल प्रत आरोपीकडेच असल्याने तक्रारदाराने ती प्रत मागितली. यावेळी आरोपी कैलास मुरकुट यांनी सदर आदेशाची मूळ प्रत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबी वाशीमकडे प्राप्त झाली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपीने पुन्हा २० हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारण्यास संमती दिली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर येथील प्रस्तुतकार-१ यांच्या कक्षात सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी कैलास मुरकुट यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
Grampanchayat election : सरपंचांवरील अविश्वास फेटाळला; नलिता गरड यांना जनतेचा कौल
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी, तसेच पोहेकॉ नितीन टवलारकर, योगेश खोटे आणि चालक पोकों मंगेश देवकाते यांनी सहभाग घेतला.








