Announcement by Public Works Minister Shivendra Singh Raje Bhosale : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घोषणा
Mumbai : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीला गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले की, २०२५-२६ या कालावधीसाठी रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत ₹१२९६.०५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीच्या मदतीने खड्डे भरणे, पावसामुळे बाधित झालेल्या मार्गांची तातडीची दुरुस्ती, तसेच पूरक कामे हाती घेतली जाणार आहेत. ॲनिमल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ४३,०४३ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जातील. यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीतील रस्त्यांवरून प्रवास करणे सोयीचे होईल.
Ashwini Vaishnaw : स्वदेशीचा मंत्र! परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय ‘ झोहो’ !
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “रस्ते हे राज्याच्या प्रगतीचे प्राणवाहिन्या आहेत. सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते निर्माण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे.” कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर विकसित केलेल्या ए आय आधारित ॲपच्या मदतीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे स्थान, दुरुस्तीची स्थिती आणि कामांची रिअल-टाइम तपासणी होणार आहे. या मुळे नागरिकांनाही प्रगतीची माहिती मिळू शकणार आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीसोबतच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमांनाही चालना दिली जाणार आहे. खड्डेमुक्त रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल, अपघातांची शक्यता कमी होईल आणि रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल, असेही भोसले यांनी सांगितले.
____








