sachin-ahir-join-shiv-sena-shinde-group-inside-story-vidhan-parishad-deputy-chairman : उपसभापतीपदाच्या उमेदवारीमागचं संपूर्ण राजकारण
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गट समर्थित उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या निर्णयामागे केवळ पक्षप्रवेश नसून अनेक दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्याशी शिंदे गटाचा संपर्क सुरू होता. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आणि त्यानंतरच सचिन अहिर यांच्यासमोरही महत्त्वाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवण्यात आल्यानंतर सचिन अहिर यांनी आपला पुढील राजकीय निर्णय निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Eknath shinde : ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मुंबईत सचिन अहिरांनी केलं ‘स्वागत’
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक १ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून सचिन अहिर यांना संधी देण्याचा निर्णय हा केवळ राजकीय नियुक्ती नसून एकनाथ शिंदे यांच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग मानला जात आहे. कारण उपसभापतीपदाच्या माध्यमातून अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेला नेता आपल्या गटात आणण्यात शिंदे यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सचिन अहिर हे केवळ विधान परिषदेचे सदस्य नाहीत, तर मुंबईतील विशेषतः वरळी परिसरातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कामगार संघटनांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून संघटन उभारण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवत उपनेतेपद, पुण्याचे संपर्कप्रमुख तसेच भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय ठाकरे गटासाठी राजकीय आणि संघटनात्मक दोन्ही पातळ्यांवर मोठा धक्का मानला जात आहे.
सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःची राजकीय जागा बाजूला ठेवली होती. त्यामुळे वरळीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघाशी जोडलेला प्रभावी चेहरा शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटासमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्या निर्णयामागे भविष्यातील राजकीय गणितही महत्त्वाचे ठरले. त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ २०२८ पर्यंत असला तरी त्यानंतर पुन्हा विधान परिषदेत निवडून येण्यासाठी आवश्यक संख्याबळ ठाकरे गटाकडे असेल का, याबाबत अनिश्चितता होती. दुसरीकडे वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व असल्याने विधानसभा निवडणुकीची संधीही मर्यादित होती. अशा परिस्थितीत महायुतीसोबत राहून पुढील राजकीय संधी मिळवण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनीही या पक्षप्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेदरम्यानही सचिन अहिर यांनी पडद्यामागून भूमिका बजावली होती आणि त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. तसेच आगामी काळात ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येतील, असाही दावा त्यांनी केला.
या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील संख्याबळावरही परिणाम झाला आहे. शिवाय मुंबईतील संघटनात्मक समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः वरळी परिसरातील कामगार संघटना आणि स्थानिक राजकारणात सचिन अहिर यांचा प्रभाव लक्षात घेता त्याचा परिणाम आगामी मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वरळीमधून १९९९, २००४ आणि २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. २००९ मध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून काम केले. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश, २०२० मध्ये उपनेतेपद, २०२२ मध्ये विधान परिषद सदस्यत्व आणि आ…








