Major blow to defaulting organizations; names of representatives from 14 Gramseva societies removed from the voters’ list : जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई; थकबाकीमुळे १४ प्रतिनिधी मतदानातून बाद
Khamgao बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वी खामगाव तालुक्यातील १४ प्राथमिक कृषी ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना मोठा धक्का बसला आहे. संबंधित संस्था बँकेच्या थकबाकीदार असल्याचे अधिकृत अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा अमरावती विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी या संस्थांच्या प्रतिनिधींची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय व सहकारी क्षेत्रातील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ८ जून २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर दाखल झालेल्या आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर ५५ प्रतिनिधींपैकी १४ प्रतिनिधींची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुनावणीदरम्यान आक्षेपकर्त्यांच्या वतीने अॅड. विजय पवार यांनी ३१ मार्च २०२६ अखेर संबंधित ग्रामसेवा संस्था बँकेच्या थकबाकीदार असल्याचा अधिकृत अहवाल सादर केला. तर गैरअर्जदार संस्थांच्या वतीने अॅड. वीरेंद्र झाडोकार यांनी बाजू मांडली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही सुनावणीत सहभाग घेतला.
चंद्रसिंग उमरावसिंग बोराडे (पोरज) व अवधूत नामदेव टिकार (कोलोरी) यांनी संबंधित १४ ग्रामसेवा संस्था थकबाकीदार असल्याने त्यांच्या प्रतिनिधींना मतदान व निवडणूक लढविण्याचा अधिकार राहत नसल्याचा आक्षेप नोंदविला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, बँकेचा अहवाल आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सादर केलेल्या नोंदींची छाननी केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३-कअ तसेच संबंधित नियमांनुसार थकबाकीदार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदान किंवा उमेदवारीचा अधिकार राहत नाही. याच कायदेशीर तरतुदीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंत्रज ग्रामसेवा संस्थेचे प्रदीप खोडके, आमसरीचे अंबादास हिंगणे, उमरा अटाळीचे कैलास ढोले, उमराचे सुधीर देशमुख, काळेगावचे गोपाल धोटे, खामगावचे गणेश माने, गोंधनापूरचे श्रीकृष्ण टिकार, जयपूरचे सारंगधर दातकर, दिवठाण्याचे भारत वाकुडकर, पिंप्री देशमुखचे विलास काळे, पोरजचे संजय दाभाडे, बोरजवळ्याचे सुरेशसिंग तोमर, वर्णाचे सुदामसिंग इंगळे आणि शिराळ्याचे भास्कर कोकरे यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
खामगाव तालुक्यातील तब्बल १४ संस्थांचे प्रतिनिधी मतदान प्रक्रियेबाहेर गेल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतांचे गणित बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निर्णयाविरोधात संबंधित प्रतिनिधी न्यायालयात दाद मागणार की पर्यायी राजकीय समीकरणे आकार घेणार, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.








