व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath shinde : ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मुंबईत सचिन अहिरांनी केलं ‘स्वागत’

Eknath shinde : ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मुंबईत सचिन अहिरांनी केलं ‘स्वागत’

eknath-shinde-reaction-on-sachin-ahir-join-shiv-sena-shinde-group-uddhav-thackeray : शिंदेंचा बोचरा टोला, ‘मी जे करतो ते फुलप्रूफच करतो’

Mumbai : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गट समर्थित उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आमच्या सहा खासदारांच्या मतदारसंघात फिरून शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी सचिन अहिर आले आहेत,” असा टोला लगावत शिंदे यांनी हा पक्षप्रवेश केवळ राजकीय नव्हे, तर संघटनात्मकदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी जे काही करतो ते फुलप्रूफ करतो. त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्याबाबत अधिक खुलासा करणार नाही, पण आम्ही जे पाऊल उचलले आहे ते पूर्णपणे कायदेशीर आणि अभ्यासपूर्वक आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाबाबत आणि उपसभापतीपदाच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या कायदेशीर चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

District Bank Election : थकबाकीदार संस्थांना मोठा धक्का; १४ ग्रामसेवा संस्थांच्या प्रतिनिधींची नावे मतदार यादीतून वगळली

सचिन अहिर यांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की, “ते तळागाळातून घडलेले कार्यकर्ते आहेत. महायुतीच्या वतीने त्यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज भरला असून उद्या त्यांची निवड होईल, अशी अपेक्षा आहे. ते केवळ मुंबईचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे उपसभापती म्हणून काम करतील. त्यांच्या आगमनामुळे कामगार क्षेत्रात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल.”

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत शिंदे यांनी पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळत असल्याचा दावा केला. “मी स्वतः मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केले. सचिन अहिर यांना संघटन उभारण्याचा मोठा अनुभव आहे. आम्ही कोणाला तोडण्यासाठी नाही, तर जोडण्यासाठी राजकारण करतो. सकारात्मक आणि व्यवहार्य राजकारण हीच आमची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.

District bank election : जिल्हा बँक निवडणुकीत ‘दादा’ फॅक्टर; आकाश फुंडकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

यावेळी त्यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका करत, “लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघाचा विकास हवा असतो. त्यामुळे अनेक जण आमच्यासोबत येत आहेत. एखादा नेता स्वतःकडे असताना चांगला वाटतो आणि दुसरीकडे गेला की त्याच्यावर टीका केली जाते. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी काहींची मानसिकता आहे,” असा बोचरा टोला लगावला.

एकनाथ शिंदे यांनी २०२२ मधील शिवसेनेतील बंडाचीही आठवण करून दिली. “२२ जून २०२२ रोजी आम्ही उठाव केला आणि ३० जूनलाच माझा शपथविधी झाला होता. आज पुन्हा ३० जून रोजीच महत्त्वाची राजकीय घटना घडत आहे, हा योगायोग आहे. महायुतीच्या काळात महाराष्ट्र विकासाच्या वेगाने पुढे जात आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी २०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींचाही उल्लेख केला. “देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, सागर बंगल्यावर पोलीस पाठवले गेले. आज त्याच लोकांना अचानक प्रेमाचा उमाळा येत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनीही आपल्या निर्णयाचे समर्थन केले. “जोपर्यंत एखादा नेता आपल्या पक्षात असतो, तोपर्यंत तो चांगला असतो; पण पक्ष सोडल्यानंतर त्यालाच स्वार्थी आणि नालायक ठरवण्याचा प्रयत्न होतो. ही दुर्दैवी मानसिकता आहे. मतदारसंघातील जनतेला माझे काम माहिती आहे,” असे सांगत त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले.

Akola Municipal corporation : स्थायी समितीतील गोंधळामागे मागास वस्ती निधीचे राजकारण?; आरोप-प्रत्यारोपांनी रंगले मनपा राजकारण

एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना सचिन अहिर म्हणाले, “तळागाळातील एका कार्यकर्त्याला उपसभापतीपदाची संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचे दाखवून दिले. कोळशातही हिरा शोधण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.”

सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः वरळीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील प्रभावी चेहरा शिंदे गटात गेल्याने मुंबईतील राजकीय समीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, “मी जे करतो ते फुलप्रूफ करतो,” या एकनाथ शिंदे यांच्या विधानाने या संपूर्ण राजकीय घडामोडीमागील रणनीतीबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.

__

error: Content is protected !!