व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून राज्यात राजकीय वादाचा स्फोट

Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून राज्यात राजकीय वादाचा स्फोट

sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-threat-politics-maharashtra : आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी, पानसरे कुटुंबीय आणि विरोधकांकडून तीव्र संताप

Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद पेटला असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला फोनवरून धमकी दिल्याचा आरोप समोर आल्याने वातावरण तापले आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी सुमारे चार दशकांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. “शिवाजी महाराजांना एकेरीत बोलणारा कोण?” अशा शब्दांत संताप व्यक्त करत गायकवाड यांनी कठोर भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे.

प्रकाशकांनी मात्र हे पुस्तक जुने असून त्यामध्ये कोणताही अवमान करण्याचा हेतू नसल्याचे सांगत गायकवाड यांना आधी पुस्तक वाचण्याचे आवाहन केले. तरीही संभाषणादरम्यान वाद चिघळल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना ऑडिओ क्लिप मोडतोड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावा केला असून पुस्तकातील मजकूर आक्षेपार्ह वाटल्यानेच आपण प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले आहे.

Malkapur tehsil administration : २०११ पूर्वीच्या घरांना कायदेशीर छत्र; अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय

या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत गायकवाड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. समाजात संभ्रम आणि वितुष्ट निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गायकवाड यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अशा प्रवृत्तीवर निशाणा साधला.

दरम्यान, पानसरे कुटुंबीयांकडूनही या प्रकरणावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. मेधा पानसरे यांनी गायकवाड यांच्या भाषेचा निषेध करत कॉम्रेड पानसरे यांचे विचार समाजात खोलवर रुजले असून ते संपवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा न्याय, सौजन्य आणि समतेचा आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक ऐंशीच्या दशकात प्रकाशित झाले असून त्यावर यापूर्वीही वाद झाले होते. मात्र त्यावेळीही गोविंद पानसरे यांनी पुस्तकाचे शीर्षक बदलण्यास नकार दिला होता. आजही हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर वाचले जात असून त्यातील विचारांवर चर्चा सुरू असते.

Buldhana BJP : सलग पराभवानंतर भाजपने जिल्हा प्रभारी बदलला, किती फायदा होणार?

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्या आधीच्या वादग्रस्त कारभाराचीही चर्चा पुन्हा रंगली आहे. यापूर्वी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे पुन्हा त्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!