व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Dhanorkar Vs Wadettiwar : चंद्रपुरात वडेट्टीवारांना ‘मोठा झटका’; खासदार धानोरकर गटाने थेट...

Dhanorkar Vs Wadettiwar : चंद्रपुरात वडेट्टीवारांना ‘मोठा झटका’; खासदार धानोरकर गटाने थेट गटनेताच बदलला!

Major Setback for Wadettiwar in Chandrapur; MP Dhanorkar Faction Directly Replaces Group Leade : संख्याबळ असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर

Nagpur : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी थेट नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेत वडेट्टीवार गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची काँग्रेसचे नवे गटनेते म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक आहेत. त्यापैकी १६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत धानोरकर गटाने स्पष्ट बहुमत आपल्या बाजूने खेचले आहे. त्यामुळे वडेट्टीवार गटाकडे केवळ ११ नगरसेवक उरल्याचे चित्र आहे. या १६ नगरसेवकांनी शपथपत्रासह सुरेंद्र अडबाले यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. वडेट्टीवार समर्थकांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला असला, तरी कायद्यानुसार बहुमताच्या आधारे गटनेता बदलता येत असल्याने धानोरकर गटाची भूमिका अधिक मजबूत मानली जात आहे.

Telegram ban : नीट फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

विशेष म्हणजे, चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या काळातही वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. हा वाद थेट दिल्लीपर्यंत गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करावी लागली होती. त्यावेळी महापौरपद धानोरकर समर्थकांकडे, तर स्थायी समिती सभापतीपद आणि गटनेतेपद वडेट्टीवार समर्थकांकडे देण्याचा तोडगा काढण्यात आला होता. मात्र, काँग्रेसकडे संख्याबळ अधिक असूनही अंतर्गत मतभेदांमुळे पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही. या परिस्थितीचा फायदा भाजपने घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीने महापौरपदावर आपला उमेदवार विराजमान केला.

सत्ता हातातून गेल्यानंतरही काँग्रेसमधील संघर्ष संपला नाही. उलट गटबाजी अधिक तीव्र होत गेली आणि आता गटनेतेपदावरून नव्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. धानोरकर गटाने बहुमताच्या बळावर गटनेता बदलण्याचा निर्णय घेतल्याने चंद्रपूर काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Rohit pawar protest : रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’

या संघर्षाची सुरुवात लोकसभा निवडणुकीदरम्यान झाली होती. माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता. त्यांनी आपल्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यावेळी आमदार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर दोन्ही नेत्यांतील राजकीय मतभेद अधिक तीव्र झाले.

लोकसभा निवडणुकीनंतर हा संघर्ष विधानसभा निवडणूक, महापालिका राजकारण आणि अलीकडील विधान परिषद निवडणुकीतही वारंवार समोर आला. परिणामी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमध्ये आता वडेट्टीवार आणि धानोरकर असे दोन स्पष्ट गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. गटनेतेपदाच्या या नव्या घडामोडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

__

error: Content is protected !!