Ramraksha Recitation Rattled the BJP; Sonam Wangchuk Detained Overnight, Alleges Sanjay Raut : मागण्यांवर चर्चा दूरच; वांगचुकांच्या प्रकृतीचीही केंद्राने घेतली नाही दखल
Nagpur : नागपुरात आज शनिवारी उद्धव सेनेच्या वतीने होणाऱ्या ‘रामरक्षा’ पठण आंदोलनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या आंदोलनावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी लपवण्यासाठीच, मागील २० दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधत संजय राऊत म्हणाले की, देशात ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटला, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले, मात्र केंद्र सरकारने अद्याप कोणावरही जबाबदारी निश्चित केलेली नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा साधा राजीनामा देखील घेण्यात आलेला नाही. याच भ्रष्टाचाराविरोधात आणि लडाखच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुक मागील २० दिवसांपासून उपोषणाला बसले होते. देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. वांगचुक यांची तब्येत कमालीची खालावत चालली असतानाही केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांची साधी दखल घेतली नाही की भाजपचा एकही नेता त्यांना भेटायला गेला नाही.
राऊत यांनी पुढे संताप व्यक्त करत सांगितले की, एकीकडे नागपुरात रामरक्षा पठणाचे मोठे आंदोलन होत असताना, नेमके शुक्रवारी रात्री वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून इस्पितळात दाखल करण्यात आले. ही निव्वळ दडपशाही असून पोलीस हे सध्याच्या सरकारचे गुलाम बनले आहेत. सरकारकडून आदेश येताच पोलिसांनी ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला.
Msrtc F : एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ
नागपुरातील रामरक्षा पठण आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, अयोध्या आणि राम मंदिर चोरांपासून मुक्त करण्यासाठी सुरू केलेले हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय आहे. म्हणूनच आम्ही रामभक्त या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांना लेखी पत्र देऊन निमंत्रण दिले आहे. नागपूरच्या रामनगर मंदिरातील ज्या मूर्तीसमोर हे पठण होत आहे, त्या मूर्तीची स्थापना स्वतः सरसंघचालकांच्या हस्ते झाली होती, म्हणूनच त्यांना विशेष निमंत्रण धाडले आहे. राम एकच आहे, तुमचा आणि आमचा राम वेगळा नाही. अयोध्या आंदोलनातही आम्हीच आघाडीवर होतो आणि रामभक्ती दाखवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, त्यामुळे सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.








