व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Msrtc F : एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ

Msrtc F : एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ

msrtc-fare-hike-13-56-percent-ticket-price-increase-reasons-maharashtra : डिझेल दरवाढ, देखभाल खर्चासह ‘ही’ कारणे महामंडळाकडून स्पष्ट

Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के प्रवासी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वाढलेले डिझेलचे दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ तसेच वाहनांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. नव्या दरवाढीमुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या प्रवास खर्चात वाढ होणार आहे.

महामंडळाच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली असून वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल यासाठीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व बाबींचा विचार करून आर्थिक शाश्वतता राखण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य ठरल्याचे महामंडळाने सांगितले.

एसटीची सेवा सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित स्वरूपात सुरू ठेवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचेही महामंडळाने नमूद केले आहे. वाढत्या खर्चामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा आर्थिक ताण निर्माण होत असल्याने प्रवाशांना सातत्याने सेवा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Rahul gandhi : “१० वर्षांत १५२ पेपरफुटी, साडेसात कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

दरम्यान, या नव्या भाडेवाढीमुळे यापूर्वी साध्या बसेससाठी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. गर्दीच्या हंगामात लागू करण्यात आलेली ही तात्पुरती वाढ १५ जुलैपर्यंत होती. त्यानंतर ती ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, आता कायमस्वरूपी १३.५६ टक्के भाडेवाढ लागू झाल्याने हंगामी वाढ मागे घेण्यात आली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाढलेले डिझेलचे दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग आणि टायर यांच्या किमती वाढल्याने भाडेवाढ टाळणे शक्य नव्हते. प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही भाडेवाढ महत्त्वाची ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच प्रवाशांनी यापुढेही एसटी सेवेला पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोठी घडामोड! उपोषणकर्ते सोनम वांगचूक रुग्णालयात दाखल

नव्या भाडेवाढीमुळे राज्यातील लाखो नियमित प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर या निर्णयाचा अतिरिक्त भार पडणार असून, एसटीच्या वाढलेल्या भाड्याचा परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, कामगार आणि ग्रामीण भागातील प्रवाशांवर अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!