Three-hour meeting between Parth Pawar and Sharad Pawar at Silver Oak; speculation intensifies over the merger of the two NCP factions : महाविकास आघाडी, महायुतीमधील पक्षांचे कान टवकारले
Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या आणि शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र तथा राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी तब्बल तीन तास बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली. या नाट्यमय भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर्कवितर्कांना मोठा ऊत आला आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे अनेक दावे केले गेले होते. अजितदादांची हीच अंतिम इच्छा होती आणि विलिनीकरणाची तारीखही ठरली होती, असा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे दावे फेटाळून लावले होते.
पुढे सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी झालेली निवड, पार्थ पवार यांची राज्यसभेवर झालेली वर्णी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा विषय आमच्यासाठी आता संपला आहे, असे जाहीर केल्याने विलिनीकरणाची चर्चा थंडावली होती.
अलीकडेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शरद पवारांचे खासदार मतदान करणार असल्याच्या चर्चांमुळे, पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार का? अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या.
या पार्श्वभूमीवर सिल्व्हर ओकवर पार पडलेल्या पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील तीन तासांच्या बैठकीने राजकीय पक्षांचे कान टवकारले आहेत. ही दीर्घ चर्चा केवळ कौटुंबिक होती की यामागे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणती नवी रणनीती शिजतेय असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.








