Arun-Lakhani-BJP-executive-to-be-supriya-sule-daughter’s- father-in-law : राजकीय आखाड्यात संघर्ष, उंबरठ्यावर सोयरीक
Nagpur महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन परस्पर विरोधी ध्रुव मानले जातात. विचारधारा आणि राजकीय भूमिकांच्या बाबतीत दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी असली, तरी कौटुंबिक स्तरावर मात्र हे दोन्ही पक्ष एक होताना दिसत आहेत. शरद पवारांची नात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या आणि विदर्भातील नामांकित उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अरुण लखानी यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत झालेली निवड सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांची प्रदेश सहकोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Nagpur Municipal corporation : भाजपने मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठेवले वेटिंगवर!
लखानी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या विचारधारेशी जोडलेले असून, आता त्यांच्याकडे पक्षाच्या आर्थिक नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांची कन्या आणि अरुण लखानी यांच्या पुत्राचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. दोन्ही कुटुंबे लवकरच व्याही म्हणून एकमेकांशी जोडली जाणार आहेत.
Shivani Dani : वडेट्टीवारांचे भाकित अन् तसेच घडले, दाणींच्या हाती महापालिकेची तिजोरी!
एकीकडे सुप्रिया सुळे संसदेत भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका करत असताना, दुसरीकडे त्यांचे होणारे व्याही भाजपच्या मुख्य कार्यकारिणीत महत्त्वाची पदे भूषवत आहेत. यामुळे राजकारण आपल्या जागी आणि नातेसंबंध आपल्या जागी, ही म्हण पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हे नाते संबंध जोडताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.








