ralegaon-34-minor-girls-missing-human-trafficking-suspected-yavatmal-news : मानवी तस्करीच्या संशयाने तपासाला वेग
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार या मुलींना परराज्यात नेऊन देहव्यापारासाठी विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणामुळे मानवी तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून विविध पथके तयार करून मुलींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अशोक उईके आणि प्रफुल्लसिंह चौहान यांनी तातडीने पोलीस प्रशासनाची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर लक्ष ठेवण्यात येत असून राळेगाव परिसरात अल्पवयीन मुलींना लक्ष्य करून त्यांना बाहेर राज्यात पाठवण्याचे प्रकार सुरू असल्याची गंभीर माहिती समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधितांकडून मिळालेली एक महत्त्वाची ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असून त्याच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
Agricultural Service Centres : खत विक्रीतील गैरप्रकार भोवला; आठ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राळेगाव पोलीस ठाण्याला भेट देत तपासाचा आढावा घेतला आहे. तपासात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये संपर्क साधण्यात येत असून तस्करीच्या संभाव्य मार्गांची तपासणी सुरू आहे.
Makrand Jadhav-Patil : बुलढाणा जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी!
राज्यात आधीच महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना नाशिक आणि परतवाडा येथील घटनांनंतर राळेगावमधील हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात महिला सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला असून मानवी तस्करीचे जाळे किती व्यापक आहे, याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरत आहे. प्रशासन या प्रकरणात कितपत जलद आणि प्रभावी कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








