Proposal seeks action against the Chief Officer of Shegaon Municipal Council : मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर अडचणीत?; नगराध्यक्षांनी बोलावली विशेष सभा
Shegao शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगराध्यक्षांनी २० जुलै रोजी विशेष सभा बोलावली आहे. विविध प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी न करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी काम सुरू केल्याचा आरोप तसेच इतर काही प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नगराध्यक्षांनी सर्व ३३ नगरसेवकांना या विशेष सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सभेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा होऊन त्यांच्याविरोधात ठराव मंजूर करणे किंवा वरिष्ठ प्रशासनाकडे कारवाईची शिफारस करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष सभेसमोर ठेवण्यात आलेल्या विषयांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी विकासकामे सुरू केल्याचा आरोप, तसेच नगर परिषदेने मंजूर केलेल्या विविध ठरावांची अंमलबजावणी न केल्याचा मुद्दा प्रमुख आहे.
४ जुलै रोजी आरोग्य सभापतींनी डी.पी. रोड तसेच शहरातील विद्युत खांब स्थलांतराच्या कामाबाबत तक्रार केली होती. संबंधित कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या प्रस्तावावर सभेत चर्चा होणार आहे.
Amravati Municipal corporation : नगरसेविका म्हणतात, पुरुषच बोलतात, आम्हाला बोलायची संधीच मिळत नाही
तसेच, २१ मार्च २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक १ नुसार महात्मा फुले व्यापारी संकुलातील २२ दुकानदारांना प्राधान्य देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या ठरावाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यासंदर्भातही मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर चर्चा होणार आहे.
याशिवाय, १० जून २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक २ नुसार अधिवक्त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ठरावाचीही अंमलबजावणी न झाल्याने संबंधित विषय विशेष सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
२४ जून रोजी मालकी हक्काच्या जागेवरील कारवाईदरम्यान नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या तक्रारीच्या अनुषंगानेही सभेत चर्चा होणार असून, या प्रकरणात पुढील प्रशासकीय भूमिका काय असावी, यावर विचारविनिमय केला जाणार आहे.
या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर २० जुलैची विशेष सभा शेगाव नगर परिषदेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, सभागृहात कोणता निर्णय घेतला जातो आणि मुख्याधिकाऱ्यांविरोधात कोणती शिफारस केली जाते, याकडे नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








