Work on the stalled Jaystambh–Rajkamal flyover to begin in October; ₹130 crore sanctioned : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ‘ॲक्शन मोड’मध्ये; प्रत्यक्ष पाहणी करून निर्देश
Amravati अमरावती शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या **जयस्तंभ-राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम आगामी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पात १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वर्षभरात काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी दिली.
अमरावती दौऱ्यावर असताना मंत्री भोसले यांनी थेट जयस्तंभ-राजकमल उड्डाणपुलाच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित कामाचा सविस्तर आढावा घेतला.
हा पूल धोकादायक झाल्याने २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीपासून त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात आले. मात्र, नव्या उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झाल्याने गेल्या वर्षभरापासून अमरावतीकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Uddhav Thackeray Shivsena : कोरडा दुष्काळ जाहीर करा; पश्चिम विदर्भात उद्धवसेनेचे आक्रोश मोर्चे
आता पुलाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, कामाला तातडीने गती देण्याचे निर्देश मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने दीर्घकाळ रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत अमरावतीकरांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील, संजय खोडके, प्रताप अडसड, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, तसेच शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, किरण पातूरकर, तुषार भारतीय, चेतन गावंडे, चेतन पवार यांच्यासह ‘बी अँड सी’ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटना : दोषींना पाठीशी घालणार नाही!
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेबाबतही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कडक भूमिका घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विंगने फायर ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात होत आहे.
ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विशेष समिती स्थापन करण्यात आल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.
“या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच, कामात कसूर किंवा दुर्लक्ष करणाऱ्या दोषींवर १०० टक्के कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट आश्वासन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.






