Shivraj Patil Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

senior congress leader shivraj-\ patil chakurkar dies at 90 latur : पाच दशकांहून अधिक सार्वजनिक जीवनाची संपन्न वाटचाल थांबली

Latur : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं लातूरमधील निवासस्थानी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचार सुरू होते; मात्र अखेर त्यांनी अंतिम श्वास घेतला. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू स्वभाव आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे भारतीय राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

१२ ऑक्टोबर १९३५ रोजी चाकूर येथे जन्मलेल्या शिवराज पाटील यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेचे शिक्षण आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. १९६७-६९ दरम्यान लातूर नगरपालिकेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये प्रथमच लातूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सातवेळा विजय मिळवत संसदेतील प्रभावी आणि अभ्यासू नेता म्हणून उभारी घेतली.

Sudhir Mungantiwar : माझा शेतकरी महत्त्वाचा म्हणत मुनगंटीवार विधानसभेत गरजले..

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री तसेच वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश विभागांसारख्या अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहून संसदेच्या आधुनिकीकरणाला नवी दिशा दिली. कामकाजाचे संगणकीकरण, थेट प्रक्षेपण आणि नवीन ग्रंथालय उभारणी यांसारख्या अनेक उपक्रमांना त्यांनी गती दिली.

२००४ मध्ये केंद्रात गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. पुढे २०१० ते २०१५ या कालावधीत ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.

Winter session : पुरवणी मागण्यांवर सभागृहात अजित पवारांचा सविस्तर खुलासा

वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. एक मुलगा, एक मुलगी आणि दोन नाती असा परिवार असून सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रिय आहेत. सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून त्यांची ओळख होती. संसदीय व प्रशासकीय अनुभव, स्वच्छ प्रतिमा आणि विविध मंत्रालयातील कामकाजाद्वारे त्यांनी दिलेलं योगदान भारतीय राजकारणात सदैव स्मरणात राहील.