Eknath Shinde Shivsena and the administration clash during the municipal council meeting : पालिकेत शिंदेसेना-प्रशासन आमनेसामने; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच खडाजंगी
Sindkhedraja नगर परिषदेत सत्ता स्थापन होऊन सहा महिने उलटूनही शहरातील मूलभूत नागरी प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या आरोपावरून नगर परिषदेत शिंदेसेना आणि प्रशासन आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे गटनेते संदीप मेहेत्रे व नगरसेवक कैलास मेहेत्रे यांनी मुख्याधिकारी आशिष बोबडे यांच्याकडे विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जाब विचारताच मुख्याधिकारी कक्षातच जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
सिंदखेडराजा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित सौरभ तायडे नगराध्यक्ष असून शिंदेसेना सत्तेतील प्रमुख भागीदार आहे. मात्र, शहरातील वाढती अतिक्रमणे, पालिकेच्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई, भाजी मंडई व मटण मार्केटसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था, तसेच राजवाडा परिसरातील पार्किंग सुविधांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “नागरिकांनी प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला निवडून दिले आहे. मात्र, कामेच होत नसतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वादानंतर गटनेते संदीप मेहेत्रे यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत, प्रलंबित प्रश्नांवर कायदेशीर व प्रशासकीय मार्ग निघाला नाही तर “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान, मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करू शकते, अशी भूमिका स्पष्ट केली. सर्व विषयांवर चर्चा करून नियमांनुसार तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही या वादावर प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात अधिक समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शहरातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
International Yoga Day : योगासनांपेक्षा ‘मखमली हिरवळ’ची चर्चा; शिंदेंच्या पोस्टने रंगले राजकारण
यावेळी शिंदे सेनेच्या वतीने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर तातडीची कारवाई, पालिकेच्या जागांवरील अतिक्रमण हटविणे, भाजी मंडई व मटण मार्केटसाठी स्वतंत्र जागा, राजवाडा परिसरात पार्किंग सुविधा उभारणे, रखडलेली नागरी विकासकामे तातडीने पूर्ण करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
या घडामोडीनंतर सिंदखेडराजा नगर परिषदेत सत्ताधारी घटक आणि प्रशासनातील वाढता तणाव पुन्हा एकदा समोर आला असून, पुढील दोन दिवसांत प्रशासनाची भूमिका आणि शिंदेसेनेची पुढील रणनीती याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.








