शिवणीवासीयांच्या चेहऱ्यावर समाधान; गावकऱ्यांना दिलासा
Chandrapur अनेक वर्षांपासून एसटी बससेवेची प्रतीक्षा करणाऱ्या चंद्रपूर तालुक्यातील मौजा शिवणी (चोर) गावकऱ्यांच्या प्रवासाला अखेर दिलासा मिळाला आहे. गावाची ही साधी वाटणारी, पण रोजच्या जगण्याशी जोडलेली अडचण घेऊन नागरिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पोहोचले. समस्या ऐकताच त्यांनी आश्वासनांवर वेळ न दवडता क्षणाचाही विलंब न करता संबंधित यंत्रणेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि एसटी सेवा सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानंतर शिवणी गावासाठी एसटी बससेवा सुरू झाली असून, अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत. आमची अडचण सांगितली आणि सुधीरभाऊंनी ती आपलीच समस्या समजून घेतली; एका फोनवर प्रश्न मार्गी लावला,या भावनेतून शिवणीवासीयांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती हृदयापासून कृतज्ञता व्यक्त केली.
शिवणी (चोर) येथील नागरिकांनी एसटी बससेवा सुरू करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. गावातील नागरिक, विद्यार्थी तसेच परिसरातील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. नागरिकांची अडचण समजून घेत आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर चंद्रपूर ते पठाणपूरा व्हाया आरवट ते शिवणी (चोर) ते कढोळी ते बाबापूर-राजुरा या मार्गावर एसटी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, परतीच्या प्रवासासाठी राजुरा ते चंद्रपूर बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवणीसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली आहे.
या बससेवेमुळे शिवणीसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. “आम्ही सुधीरभाऊंना एकदा भेटलो, आमची समस्या सांगितली. त्यांनी ती ऐकून घेतली आणि लगेच फोन करून पाठपुरावा केला. अनेक वर्षांपासून आमच्या गावात एसटी बस येत नव्हती; मात्र त्यांच्या तत्परतेमुळे आता बससेवा सुरू झाली. आमची अडचण समजून घेऊन तातडीने मार्ग काढल्याबद्दल सुधीरभाऊंचे हृदयापासून आभार,” अशी कृतज्ञ भावना शिवणीवासीयांनी व्यक्त केली.प्रश्न छोटा असो वा मोठा, नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी तत्पर राहण्याची आ. मुनगंटीवार यांची भूमिका शिवणीतील एसटी सेवेतून पुन्हा अधोरेखित झाली.








