Honor to Chandrapur’s Pride! Rajmata Rani Hirai Jayanti to be celebrated at the government level on April 20; Mungantiwar’s efforts succeed : चंद्रपूरमध्ये भव्य महोत्सव, सांस्कृतिक कार्य विभागाकडून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर
Chandrapur चंद्रपूर शहराच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या आणि गोंडवानाच्या ‘शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राणी हिराई यांचा जन्मोत्सव आता चंद्रपुरात शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात साजरा होणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मिळाले असून, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या उत्सवासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता. येत्या २० एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर येथे हा महोत्सव मोठ्या थाटात पार पडणार आहे.
राजमाता राणी हिराई यांच्या दूरदृष्टीपूर्ण कारभारामुळे चंद्रपूर शहराला एक वैभवशाली ओळख प्राप्त झाली. माता महाकाली मंदिर आणि राजा बिरशहा यांची समाधी यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंच्या उभारणीतून त्यांनी शहराचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा समृद्ध केला. या दैदिप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि चंद्रपूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, या हेतूने राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम उईके यांनी निधीची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे निधीची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या पत्राची तातडीने दखल घेत राज्य शासनाने १२ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय काढून राजमाता राणी हिराई जन्मोत्सवासाठी निधी मंजूर केला आहे. यामुळे चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, राणी हिराई यांच्या गौरवशाली कार्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
Amruta fadnavis : अमृता फडणवीसांचे विधान चर्चेत; टीसीएस प्रकरणावरून व्यक्त केली चिंता
येत्या २० एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव, सोमेश्वर मंदिराजवळ हा जन्मोत्सव सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गोंडकालीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे संगीत, वादन आणि नृत्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच, वन उत्पादन आणि हस्तकला प्रदर्शनीचेही विशेष आयोजन करण्यात येणार आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे स्थानिक कलाकारांना आणि गोंडकालीन कलेला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.








