amruta-fadnavis-on-tcs-nashik-case-axis-bank-conversion-claim : कॉर्पोरेट क्षेत्रात धर्मांतराचे प्रकार झाल्याचा दावा
Mumbai : नाशिकमधील टीसीएस प्रकरणावरून राज्यात खळबळ उडालेली असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात धर्मांतरासारखे प्रकार घडत असल्याचा दावा करत त्यांनी अॅक्सिस बँकेत कार्यरत असताना स्वतःसमोरही अशा घटना घडल्याचे सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकारांबद्दल खेद व्यक्त करत व्हिसलब्लोइंगचे महत्त्व अधोरेखित केले.
नाशिकमधील टीसीएस प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. संस्थेमध्ये काही बेकायदेशीर किंवा अनैतिक घडत असल्यास ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी व्हिसलब्लोइंगद्वारेच अशा प्रकारांवर आळा घालता येऊ शकतो, असे मत मांडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कॉर्पोरेट व्यवस्थापनातील अंतर्गत यंत्रणांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून लैंगिक शोषण, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पीडितांनी पुढे येत तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरोधात नऊ गुन्हे दाखल केले आहेत. महिलांवर अत्याचार, अश्लील वक्तव्ये, जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांचा यात समावेश आहे.
Pune land scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातील ‘मास्टरमाइंड’ शीतल तेजवानीला जामीन
या प्रकरणानंतर कंपनी व्यवस्थापनानेही हालचाल करत अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. पुणे आणि मुंबई येथील मनुष्यबळ विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून कर्मचाऱ्यांना तात्पुरते घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विभाग आणि कामगार विभागानेही स्वतंत्रपणे कंपनीत भेट देऊन माहिती घेतली आहे.
Nana Patole : महिला आरक्षणाच्या आडून भाजपला आणायचा होता ‘मनुवाद’; नाना पटोलेंचा घणाघात
महिलांच्या सुरक्षेसाठी पॉश कायद्यांतर्गत अंतर्गत तक्रार समिती अस्तित्वात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात घडलेल्या घटनांमुळे या यंत्रणांची कार्यक्षमता आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यसंस्कृती, कर्मचारी सुरक्षा आणि तक्रार निवारण प्रणाली यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
___







