sudhir-mungantiwar-demand-20000-bonus-per-hectare-for-paddy-farmers-maharashtra-assembly : धान उत्पादकांसाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा आग्रही, सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
Mumbai : धान उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या मदतीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आवाज बुलंद करत मैदानात उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी थांबतील ते मुनगंटीवार कसले, अशी त्यांची कार्यशैली राहिली आहे. आज विधानसभेत प्रति हेक्टर २० हजार रुपये धान बोनस तातडीने जाहीर करण्याची जोरदार मागणी करत सरकारचे लक्ष वेधले आहे.
राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री असलेल्या मुनगंटीवार यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले की, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील हजारो शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या अडचणीत आहेत. उत्पादन घट, वाढलेला खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला असून तातडीची आर्थिक मदत आवश्यक आहे.
मुनगंटीवार यांनी यावेळी २०२४-२५ मधील निर्णयाची आठवण करून दिली. त्या वेळी नोंदणीकृत धान उत्पादकांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील वर्षी १५८६.७१ कोटी रुपयांचा धान बोनस वितरित केला होता. २०१३ मध्ये ३०० कोटी रुपयांपासून सुरू झालेली ही मदत मागील वर्षी विक्रमी पातळीवर पोहोचल्याचा दाखला देत त्यांनी सरकारला यंदाही तत्सम निर्णय घेण्याचे आवाहन केले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचा महापौर २४ कॅरेट शुद्ध भाजपचाच, भिवंडीत तुमचा आहे का?
१५ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र चालू वर्षात अद्याप ठोस घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. “धान उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्विंटलने वाढवा !
मागील वर्षी त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला होता. यंदाही त्याच पद्धतीने त्यांनी प्रश्न लावून धरला असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळाल्यास ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळेल आणि आर्थिक अडचणी कमी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावर सरकारकडून लवकरच ठोस निर्णय अपेक्षित असल्याची चिन्हे दिसत आहेत.
__








