congress-support-to-vijay-tvk-tamil-nadu-government-formation-deal-minister-demand : तामिळनाडूच्या राजकारणात दोन्ही पक्षांतील राजकीय सौदेबाजी चर्चेत, काँग्रेसला सत्तेत हवा वाटा
Chennai : तामिळनाडूच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ घडवत विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी राजकीय सौदेबाजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. बहुमतापासून थोडे अंतर असतानाही सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय यांना काँग्रेसने सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी थेट सत्तेत वाटा मागितला आहे.
२३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून टीव्हीकेने इतिहास रचला असला तरी बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पाच आमदार निर्णायक ठरत असून त्यांनी विजय यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र हा पाठिंबा विनाअट नसून सरकारमध्ये दोन मंत्रिपदे तसेच विविध बोर्ड आणि कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्षपदे देण्याची स्पष्ट अट काँग्रेसकडून घालण्यात आली आहे.
काँग्रेसच्या व्हर्च्युअल बैठकीत या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत सखोल चर्चेनंतर टीव्हीकेला पाठिंबा देण्यावर एकमत झाले, मात्र सत्तेत योग्य वाटा मिळाल्याशिवाय अंतिम निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीतील निष्कर्षांचा अहवाल काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात येणार असून अंतिम निर्णय त्यांच्याकडून घेतला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून उद्या अधिकृत पाठिंबा पत्र दिले जाण्याची शक्यता असून त्यानंतर आमदारांची विजय यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट होणार आहे.
सत्तास्थापनेच्या हालचाली वेगात सुरू असताना विजय यांनी चेन्नईतील पट्टिनमपक्कम येथील निवासस्थानी आमदारांची बैठक घेत संभाव्य मंत्रिमंडळावर चर्चा केली. या बैठकीत काही नावांवर प्राथमिक सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये एन. आनंद, अरुणराज, सेंगोट्टैयन, अधव अर्जुना, सीटीआर निर्मलकुमार, मारिया विल्सन, राजमोहन, वीएस बाबू आणि जेसीडी प्रभाकर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, टीव्हीकेने राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली असून सरकार स्थापनेचा दावा सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विजय ७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण नऊ मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीत टीव्हीकेने द्रविडीय राजकारणातील दीर्घकाळ टिकलेली द्विध्रुवीय व्यवस्था मोडून काढत डीएमके आणि एआयएडीएमके या पारंपरिक पक्षांना मोठा धक्का दिला आहे. डीएमकेला ५९ जागांवर समाधान मानावे लागले, तर एआयएडीएमके ४७ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. विशेष म्हणजे डीएमकेचे प्रमुख स्टालिन यांना कोलाथूर मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला.
Ravi Rana : ‘ज्यांचे केस पांढरे झाले आहेत, त्यांनी दिवसा स्वप्न पाहणे सोडावे’
एकीकडे विजय सत्तेच्या उंबरठ्यावर उभे असताना दुसरीकडे काँग्रेसने टाकलेली अटींची अडचण ही नव्या सरकारच्या स्थिरतेसाठी पहिली मोठी कसोटी ठरणार आहे. तामिळनाडूच्या सत्तासमीकरणात सुरू झालेली ही उघड सौदेबाजी पुढील काही दिवसांत आणखी रंगतदार आणि संघर्षमय होण्याची चिन्हे दिसत आहेत.








