Demand for Teachers to Be Given Candidature from Teachers’ Constituency : प्राथमिक शिक्षकांनाही मतदानाचा अधिकार देण्याचे आवाहन
Akola शिक्षक मतदारसंघातून केवळ प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांनाच निवडणूक लढविण्याची संधी मिळावी आणि प्राथमिक शिक्षकांनाही शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार यांनी केली आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम १७१ नुसार विधान परिषदेत शिक्षकांसह विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था आहे. कलम १७१(३)(क) नुसार माध्यमिक शाळा किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये किमान तीन वर्षे अध्यापन केलेल्या व्यक्तींना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकार आहे. मात्र, शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार स्वतः शिक्षक असणे बंधनकारक नाही.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांचे प्रत्यक्ष ज्ञान असलेला शिक्षकच या मतदारसंघातून आमदार झाल्यास शिक्षण क्षेत्रातील समस्या अधिक प्रभावीपणे विधान परिषदेत मांडता येतील, असा दावा खडक्कार यांनी केला आहे. विनाअनुदानित शाळांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, वेतनातील विसंगती तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा प्रश्न त्यांनी अधोरेखित केला.
Sanjay Raut : ‘दुष्काळाच्या बैठका स्टेडियमवर घ्या आणि लोकांना कळू द्या’; संजय राऊतांचा टोला
प्राथमिक शिक्षकांनाही शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार माध्यमिक व त्यापुढील स्तरावरील शिक्षकांचा मतदारसंघात समावेश होतो. प्राथमिक शिक्षकांची संख्याही मोठी असल्याने त्यांनाही प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे खडक्कार यांनी म्हटले आहे.
या दोन बदलांसाठी संबंधित कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कायद्यात बदल होईपर्यंत शिक्षक मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या पसंतीच्या शिक्षक उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.








