व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Tukaram mundhe : तुकाराम मुंढेंची राज्यातील सर्वात मोठी धडक कारवाई!

Tukaram mundhe : तुकाराम मुंढेंची राज्यातील सर्वात मोठी धडक कारवाई!

 

tukaram-mundhe-biggest-fda-action-chemical-milk-racket-busted-13-arrested : भेसळ दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश; 6 जिल्ह्यात १३ अटकेत, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

Mumbai : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तब्बल सहा जिल्ह्यांत एकाचवेळी छापेमारी करत केमिकल दुधाचे मोठे आंतरजिल्हा रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील दूध भेसळीच्या गंभीर समस्येचे भयावह वास्तव पुन्हा समोर आले आहे.

ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने आखण्यात आली होती. गेल्या महिनाभरापासून अन्न व औषध प्रशासन विभाग या रॅकेटवर गुप्तपणे लक्ष ठेवून होता. एका विश्वसनीय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीची सखोल पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करत दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. अखेर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि एफडीएच्या सुमारे ४५ सदस्यांच्या विशेष पथकाने एकाचवेळी विविध ठिकाणी छापे टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला.

Sudhir Mungatiwar: मुनगंटीवारच चॅम्पियन! तगड्या मांडणीसमोर सरकारलाही द्यावे लागले सकारात्मक आश्वासन

सहा जिल्ह्यांत एकाचवेळी छापेमारी –
या कारवाईदरम्यान पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी येथे एकाचवेळी धाड टाकण्यात आली. प्राथमिक तपासात पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव या जिल्ह्यांपर्यंतही या रॅकेटचे जाळे पसरल्याची माहिती समोर आली आहे. मंचर येथून या संपूर्ण रॅकेटचे संचालन होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मुख्य आरोपीसह एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘दुधाबाबतची ही सर्वात मोठी कारवाई’ –
या कारवाईबाबत माहिती देताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, दुधाच्या भेसळीसंदर्भात करण्यात आलेली ही विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. महिनाभर माहिती संकलित करून त्याची पडताळणी करण्यात आली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केमिकल दूध तयार करून त्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आली. कृत्रिम दूध तयार करून पुरवठा करणाऱ्या संघटित टोळीचा आता पर्दाफाश झाला असून या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला जात आहे.

Devendra fadnavis : विरोधकांच्या मेंदूतून अक्कलच ‘मिसिंग’ मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर !

दुधात पाणी नव्हे, थेट रासायनिक पदार्थांची भेसळ –
या टोळीची कार्यपद्धती अत्यंत धक्कादायक असल्याचे तपासात उघड झाले आहे. डेअरीमध्ये येणाऱ्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ मिसळून त्याचे प्रमाण वाढवले जात होते. सुमारे ५०० लिटर दुधात ३०० लिटरपर्यंत, तर १००० लिटर दुधात जवळपास ५०० लिटरपर्यंत भेसळ केली जात होती. दुधाला नैसर्गिक स्वरूप मिळावे यासाठी वास न येणारा शॅम्पू, दूध पावडर, विविध रासायनिक पदार्थ आणि पाण्याचा वापर करून बनावट दूध तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

नामांकित कंपन्यांपर्यंत पोहोचत होते भेसळयुक्त दूध –
प्राथमिक तपासानुसार हे भेसळयुक्त आणि रासायनिक दूध राज्यातील काही नामांकित डेअरी आणि ब्रँडपर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दुधापासून पनीर, खवा तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करून ते गेल्या दोन वर्षांपासून बाजारात विकले जात असल्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

किराणा दुकानदारांपासून डेअरी चालकांपर्यंत तपास –
या रॅकेटमध्ये केवळ दूध पुरवठादारच नव्हे तर काही किराणा दुकानदार आणि डेअरी व्यवसायाशी संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. संबंधित आर्थिक व्यवहार, पुरवठा मार्ग आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणारी साखळी यांचाही तपास सुरू आहे.

Assembly adjourned : अतिवृष्टीचा विधिमंडळावरही परिणाम; विधानसभा स्थगित

आणखी दोन टोळ्या रडारवर; मकोकाचीही शक्यता –
तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर अशाच प्रकारे काम करणाऱ्या आणखी दोन संघटित टोळ्यांबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कलमे लावण्यात येणार असून गरज भासल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दूध भेसळीविरोधातील ही कारवाई राज्यभरात मोठा संदेश देणारी ठरली असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संघटित रॅकेटविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आता अधिक आक्रमकपणे कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत या धाडीतून मिळाले आहेत.

error: Content is protected !!