व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Tukaram mundhe : महिन्याभरातच भेसळखोरांवर मुंढेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

Tukaram mundhe : महिन्याभरातच भेसळखोरांवर मुंढेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

tukaram-mundhe-fda-action-22-lakh-kg-adulterated-food-seized-maharashtra : २२ लाख किलो निकृष्ट अन्न जप्त; २९ कोटींच्या साठ्यावर कारवाई

Mumbai: राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर आणि नियमबाह्य अन्न व्यवसायिकांविरोधात धडक कारवाईचा सपाटा लावत मोठी कामगिरी केली आहे. “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत त्यांनी राज्यभरात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २२ लाख ४ हजार १८२ किलो भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि संशयित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे २९ कोटी ११ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याने भेसळखोरांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडल्याची चर्चा आहे.

२५ मे ते २४ जून या कालावधीत मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी धडक छापेमारी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान ४३१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. आंबे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, तयार फळांची पेये, रंगमिश्रित सुपारी, चहा पावडर, पिण्याचे पाणी, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध रसायनांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Prataprao Jadhav, Rajendra Shingne : जिल्हा बँकेच्या रणांगणात प्रतापराव जाधवांची एन्ट्री; शिंगणेंना आव्हान

तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकीर्द कठोर निर्णय, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराविरोधातील स्पष्ट भूमिकेमुळे ओळखली जाते. त्यामुळेच त्यांनी ज्या विभागात काम केले, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा झाली. मात्र त्याचवेळी वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांना एखाद्या विभागात दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळालेली नाही. बहुतांश वेळा सहा ते आठ महिन्यांच्या आतच त्यांची बदली झाल्याचे चित्र यापूर्वी दिसून आले आहे.

अन्न व औषध प्रशासनात रुजू झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे राज्यभरात त्यांच्या कामाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्याच्या भूमिकेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना या विभागात किमान तीन वर्षे काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी विधानसभेतही करण्यात आली होती.

दरम्यान, त्यांच्या बदलीसाठी तब्बल अडीचशे कोटी रुपये जमा केल्याचा गंभीर आरोपही विधानसभेत करण्यात आला होता. या आरोपांवर अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी झालेली नसली, तरी मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे काही हितसंबंधांना धक्का बसत असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

Trauma centre : ट्रॉमा सेंटरचे श्रेय घेण्यासाठी राजकीय रस्सीखेच; जाधव-खरात समर्थक आमनेसामने

या संपूर्ण घडामोडींमध्ये मात्र तुकाराम मुंढे यांनी आपला भर केवळ कारवाईवरच ठेवला आहे. “महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि कायदेशीर उत्पादने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. बनावट, विनापरवाना, दिशाभूल करणारी किंवा सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

राज्यातील अन्न भेसळीविरोधातील ही धडक मोहीम आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महिन्याभरातील आकडेवारी पाहता, भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने उघडलेली ही मोहीम केवळ कारवाईपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे.

error: Content is protected !!