Uday Samant expresses displeasure over the security arrangements : उद्योगमंत्री उदय सामंतांची सुरक्षा व्यवस्थेवर नाराजी, पोलीस अधिक्षकांनी दिले हद्द बदलल्याचे कारण
Amravati राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूरहून अमरावतीकडे येत असताना वर्धा जिल्ह्याची हद्द संपल्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरही पोलिस बंदोबस्त आणि पायलट वाहन उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, “नेमके काय सुरू आहे, हेच मला कळत नाही. मंत्र्यांसोबत असलेल्या सुरक्षारक्षकांसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. मात्र माझ्याच बाबतीत वारंवार असे का घडते, याचा विचार करावा लागत आहे.” यावेळी आमदार बच्चू कडू आणि प्रीती बंड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘सहा-सात महिन्यांपासून सातत्याने दुर्लक्ष’
हा प्रकार प्रथमच घडलेला नसल्याचा दावा करत सामंत यांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरक्षा व्यवस्थेबाबत सातत्याने त्रुटी होत असल्याचा आरोप केला. “मला सुरक्षारक्षकांसाठीचे वाहनही अनेकदा उपलब्ध करून दिले जात नाही. हे कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी केले जात आहे, हे मला माहीत नाही,” असे म्हणत त्यांनी गृह विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अमरावती येथे शिंदेसेनेच्या महत्त्वाच्या मेळाव्यासाठी उदय सामंत विदर्भ दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील कॅबिनेट मंत्र्यांनीच सुरक्षा व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
Trauma centre : ट्रॉमा सेंटरचे श्रेय घेण्यासाठी राजकीय रस्सीखेच; जाधव-खरात समर्थक आमनेसामने
दरम्यान, अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी सामंत यांच्या आरोपांचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, “मंत्री उदय सामंत यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत प्रवेश करताच निर्धारित नियमानुसार दोन्ही बाजूंनी पायलटिंग स्क्वॉडद्वारे सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच परतीच्या प्रवासातही त्यांना आवश्यक बंदोबस्तासह वर्धा पोलिसांच्या ताब्यात रीतसर सुपूर्द करण्यात आले.”
दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने प्रत्यक्षात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी झाली होती की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.








