Thackeray’s Shiv Sena turns aggressive over fertilizer shortage; Agriculture Department assures adequate fertilizer supply in rural areas : उषा गायकवाड यांच्या नेतृत्वात शेतकरी प्रतिनिधींचे निवेदन; दोन दिवसांत युरिया-डीएपीचा पुरेसा साठा उपलब्ध होणार
Akola खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्माण झालेल्या खतटंचाईच्या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या.
यावेळी सर्व प्रकारची रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, खत खरेदीसोबत बियाणे किंवा इतर कृषी साहित्य खरेदीची सक्ती तात्काळ बंद करणे, ग्रामीण भागातील कृषी केंद्रांवर प्राधान्याने खतांचा पुरवठा करणे, शासनमान्य दराने खते उपलब्ध करून देणे तसेच कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या व जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणे, या प्रमुख मागण्या शिष्टमंडळाने मांडल्या.
Property card : सातबारा बंद, आता मिळणार अधिकृत प्रॉपर्टी कार्ड! हद्दवाढीतील नागरिकांना मोठा दिलासा
या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकृत खत वितरकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. फोन स्पीकरवर ठेवून वितरकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की, खतांचे रॅक उपलब्ध होताच प्रत्येक गाव व खेड्यापाड्यातील कृषी केंद्रांपर्यंत खतांचा पुरवठा करण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरांमध्ये किंवा मुख्य बाजारपेठांमध्ये धावपळ करावी लागणार नाही तसेच वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही टाळता येईल.
यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला युरिया, डीएपीसह आवश्यक रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. तसेच विभागीय कृषी सहसंचालक यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. त्यांनी अकोला जिल्ह्यासाठी येत्या दोन दिवसांत युरिया व डीएपी खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील कृषी केंद्रांना प्राधान्याने खतपुरवठा करण्याबाबत वितरकांना सूचना दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.








