Sharad Pawars question, Fadnavis’ reply : शरद पवारांचा सवाल, फडणवीसांचं प्रत्युत्तर! “
Mumbai : पुण्यातील मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या जमीन व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण अजून शांत झालेलं नाही. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अडकलेली असताना, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावर आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितलं की, “मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाला गंभीर म्हटलं आहे. जर एखादा विषय गंभीर आहे असं मुख्यमंत्री म्हणत असतील, तर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचं वास्तव समाजासमोर मांडायला हवं. मुंढव्यातील जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे, याचा अर्थ काहीतरी गंभीर घडलेलं आहे.” ते पुढे म्हणाले की, “सरकारी अधिकाऱ्यांनी मजबूत पुरावे पाहूनच निर्णय घेतला असावा. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याचा सखोल तपास करावा.”
Pune land scam : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेत केला मोठा खुलासा !
पत्रकारांनी पवारांना विचारलं की, या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? यावर शरद पवार म्हणाले, “त्याचं उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील, मी नाही.”
यानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी शरद पवारांच्या प्रश्नाला थेट उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “या प्रकरणात एफआयआर नोंदवला गेला आहे. एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्यात ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि ज्यांनी व्यवहार केला, त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नाही, कारण ते त्या व्यवहाराचे ऑथराईज सिग्नेटरी नव्हते.”
Municipal corporation : महानगरपालिकेत आमदारांनी वाचला समस्यांचा पाढा !
फडणवीस पुढे म्हणाले, “या प्रकरणात ज्या व्यक्तींनी व्यवहार केला, बनावट कागदपत्रं तयार केली आणि शासकीय अधिकारांचा गैरवापर केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सरकार कुणालाही वाचवत नाही. आमचा कुणालाही ढाल बनवण्याचा प्रयत्न नाही. जर तपासादरम्यान कोणाचाही थेट सहभाग आढळला, तर कारवाई टाळली जाणार नाही. तेव्हा पार्थ पवार असोत किंवा कुणीही, पुरावे सापडले तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करू.”
या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या अमेडिया कंपनीतील मालकीच्या रचनेबाबतही अनेक संशय व्यक्त होत आहेत. दस्तऐवजनुसार पार्थ पवार यांची या कंपनीत तब्बल 99 टक्के हिस्सेदारी आहे, तर दिग्विजय पाटील यांची फक्त 1 टक्के. याच दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विरोधक आता प्रश्न विचारत आहेत की, मालक 99 टक्के असताना जबाबदारी फक्त 1 टक्के धारकावरच का?
Thombre Vs Chakankar : चाकणकरांविषयी बोलणं दुसऱ्या रुपालीला महागात !
शरद पवार यांनी पुढे शीतल तेजवानी आणि इतर आरोपींबद्दल विचारलं असता उत्तर दिलं की, “मला त्यांची नावं माहीत नाहीत. आरोप करणाऱ्यांनीच त्यांच्याबद्दल पुरावे आणावेत.”
मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या या व्यवहाराने राज्यात राजकीय वातावरण तापवलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्याचवेळी, फडणवीसांनी केलेल्या “कोणाचाही सहभाग आढळल्यास गुन्हा दाखल करू” या वक्तव्याने या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालं आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, या घोटाळ्यातील गुंतागुंत वाढत चालली असून, त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीतील समीकरणांवरही होऊ शकतो.
______








