Vijay Wadettiwar outraged over deletion of names of nearly 2 crore voters : निवडणूक आयोग निष्पक्ष नसून गुलामासारखे काम करत असल्याची टीका
Nagpur सुधारित मतदार याद्यांची प्रारूप यादी जाहीर होताच विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, राज्यातील तब्बल २ कोटी (सुमारे २१ टक्के) मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष नसून गुलामासारखे काम करत आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा अत्यंत तीव्र शब्दांत वडेट्टीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.
देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनर्विलोकन प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रातही ही मोहीम राबवण्यात आली. मृत, स्थलांतरित आणि दुबार नावे वगळली जात असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात विरोधी पक्षाची आणि विशेषतः मुस्लिम मतदारांची मते पद्धतशीरपणे गाळण्याचा हा कार्यक्रम असल्याचा गंभीर संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाच्या कामात भाजपचे कार्यकर्ते उघड हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काँग्रेसने पुन्हा एकदा केला आहे. नागपूरच्या आमदार निवासात भाजप कार्यकर्त्यांची टीम मुक्कामाला ठेवून कोणत्या मतदारांची नावे ठेवायची आणि कोणती गाळायची, याचे निर्देश दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी मुस्लिमांच्या नावांसमोर लाल रंगाने टिकमार्क केलेला ‘कलर कोड’ कागद समोर आला होता, याकडे लक्ष वेधत विरोधकांची मते जाणीवपूर्वक कमी केली जात असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २१ टक्के मते वगळल्याच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.








