Sudhir Mungantiwar resolves to bring the light of government schemes into the lives of the underprivileged on Prime Minister Narendra Modi’s birthday : उपेक्षितांच्या आयुष्यात योजनांचा प्रकाश पोहोचविण्याचा मुनगंटीवारांचा संकल्प, चिमुकल्यांच्या हस्ते ७६ फुटांचा केक कापला
Chandrapur चिमुकल्या लेकींच्या चेहऱ्यावरचा आनंद, ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रज्वलित झालेला ‘आशीर्वादाचा दिवा’ चंद्रपूर येथील गांधी चौकात पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनाचा हा सोहळा भावनेने ओथंबून गेला. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून प्रज्वलित करण्यात आलेल्या या आशीर्वादाच्या दिव्यातून पंतप्रधानांच्या हातून देशसेवेचे कार्य अखंड घडत राहावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा संदेश देत आ.मुनगंटीवार यांची नात शूरवी आणि ३५ चिमुकल्या मुलींच्या शुभहस्ते ७६ फुटांचा केक कापून मोदीजींचा जन्मदिन आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. वंचित, शोषित, गरीब, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आशा, सन्मान आणि विकासाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या पंतप्रधानांच्या सेवासंकल्पाला चंद्रपूरने या भावस्पर्शी सोहळ्यातून सलाम केला.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला यावेळी महानगराच्या प्रथम नागरिक संगीताताई खांडेकर, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सौ. सपनाताई मुनगंटीवार, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रवी लोणकर, जयश्रीताई जुमडे, छबुताई वैरागडे , सुनीताताई जयस्वाल, सविताताई सरकार, प्रज्वलंत कडू, ब्रिजभूषण पाझारे, सूरज पेदूलवार, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर, मुग्धाताई खांडे, नम्रता ठेमस्कर, शुभांगीताई शर्मा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला-भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘आशीर्वादाचा दिवा’ हा केवळ एक दिवा नाही; देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचावी, गरीबाच्या घरात आनंद निर्माण व्हावा आणि वंचितांच्या आयुष्यात विकासाचा प्रकाश पडावा, यासाठीचा चंद्रपूरचा आशीर्वाद आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हातून देशाची अशीच अविरत सेवा घडत राहावी, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, हीच आजच्या दिवशी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा जन्मदिन हा केवळ आनंदोत्सवाचा दिवस नाही, तर सेवा आणि संकल्पाचा दिवस आहे. पुढील ३६५ दिवसांत आपल्या आजूबाजूला जिथे कुठे अंधार असेल, तिथे विकासाचा दिवा घेऊन जाण्याचा संकल्प प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाने आणि कार्यकर्त्याने केला पाहिजे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यांचा उल्लेख केला. गरीबाच्या घरात बँक खाते उघडणे, महिलांच्या घरात गॅस पोहोचवणे, शौचालय पोहोचवणे, गरिबांना आरोग्य संरक्षण देणे, शेतकऱ्याला आर्थिक आधार देणे, घराघरात नळाचे पाणी पोहोचवणे आणि सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याची संधी निर्माण करणे या योजनांच्या माध्यमातून विकासाचा प्रकाश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे, असे आ.मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir mungantiwar : पक्षभेदांच्या पलीकडे माणुसकी; मुनगंटीवारांच्या मनगटाला कृतज्ञतेची राखी
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारताच्या बदलत्या प्रवासाचा संदर्भ देताना आ. मुनगंटीवार यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पांचा उल्लेख केला. चांद्रयान-३च्या यशाने भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याची जगाला जाणीव झाली असून, भारत आता केवळ जगाच्या मागे चालणारा देश नसून जगाला सोबत घेऊन पुढे जाणारा भारत असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदीजींनी स्वतःच्या परिवारासाठी नव्हे, तर १४० कोटी भारतीयांना आपला परिवार मानून सेवा करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपणही आपल्या परिसरातील वंचित, शोषित, गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि गरजू व्यक्तीच्या जीवनात परिवर्तनाचा एक दिवा पेटवण्याचा संकल्प करूया, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मोदीजींच्या पंतप्रधानपदाच्या प्रारंभीच्या संसदेतील प्रवेशाचा संदर्भ देत “संसद भवन ही केवळ दगडांची इमारत नसून लोकशाहीचे मंदिर आहे आणि जनता ही ईश्वराचा अंश आहे, या भावनेने जनसेवा करण्याच्या त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. “सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा,” या संकल्पातून देशसेवेला समर्पित नेतृत्वाची भावना व्यक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रपूरच्या विकासाचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यात ४७४ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली असून पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात ‘चलो जलाएं दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है’ या भावनेतून ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. हा दिवा पुढील ३६५ दिवसांसाठी सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प जागवणारा ठरावा, अशीभावना आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली . बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा संदेश देत आ. मुनगंटीवार यांच्या नात शूरवीसह ३५ चिमुकल्या मुलींनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रतिमेचे मुखवटे परिधान करून ७६ फुटांचा केक कापला. “बेटी पुढे गेली तर देश पुढे जाईल” हा संदेश यावेळी देण्यात आला.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. देशातील कोट्यवधी जनतेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या या सेवाव्रती नेतृत्वाला उत्तम आरोग्य, निरामय जीवन आणि दीर्घायुष्य लाभावे; त्यांच्या हातून वंचित, शोषित आणि गरजूंची अशीच अविरत सेवा घडत राहावी आणि भारताला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्याचे सामर्थ्य त्यांना सदैव लाभावे, अशी भावपूर्ण प्रार्थना आ. मुनगंटीवार यांनी माता महाकालीच्या चरणी केली.








