व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने ‘वंचित’ला पाठिंबा द्यावा

Legislative election : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने ‘वंचित’ला पाठिंबा द्यावा

Demand for Congress to support Vanchit Bahujan Aghadi to counter the BJP : धैर्यवर्धन पुंडकर आणि डॉ. नीलेश विश्वकर्मा यांची मागणी; काँग्रेसच्या भूमिकेकडे विदर्भाचे लक्ष

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत दररोज नवे राजकीय घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. अशातच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य पाठिंब्याच्या राजकारणाने रंगत वाढवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश विश्वकर्मा यांना काँग्रेसने अधिकृत पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव वंचितकडून काँग्रेससमोर ठेवण्यात आला आहे.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेत आपल्या सदस्यांना व्हिप जारी करून वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली आहे. मात्र, याबाबत काँग्रेसने अद्याप अंतिम भूमिका स्पष्ट केलेली नाही.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी सांगितले की, पाठिंब्याच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत प्राथमिक स्तरावरील दोन ते तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. “सुरुवातीपासूनच काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेत वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी आमची भूमिका राहिली आहे,” असे विश्वकर्मा यांनी स्पष्ट केले.

आम्ही शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारी राजकीय चळवळ उभी करत आहोत. या विचारांना पाठिंबा द्यायचा की जातीवादी शक्तींना बळ द्यायचे, हे काँग्रेसने ठरवावे, असा थेट सवाल डॉ. विश्वकर्मा यांनी उपस्थित केला.

Akola Municipal corporation : अकोला मनपात काँग्रेसची वाताहत, १७ नाराज नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष

काँग्रेसच्या निवडणूक तयारीवर टीका करताना ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या असून आमची संघटनात्मक तयारी भक्कम आहे. महाराष्ट्रातील सात ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे काँग्रेसची निवडणूक तयारी कितपत होती, हा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुकीच्या मैदानात उतरताना पूर्ण तयारी आवश्यक असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांची प्रकृती बिघडल्यामुळे या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. यावर भाष्य करताना धैर्यवर्धन पुंडकर यांनी खळबळजनक दावा केला.

“हर्षजित देशमुख यांना उमेदवारी देऊ नका, ते ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेऊ शकतात, अशी सूचना आम्ही यापूर्वीच काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला दिली होती,” असा दावा पुंडकर यांनी केला. बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणे हाच सर्वात योग्य पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अचानक प्रचारातून दूर झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Heritage of Buldhana : कागदपत्रे दिली, निवेदनेही झाली; तरी चार वेशींचे संवर्धन रखडल्याने

“ऐनवेळी कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही. स्थानिक काँग्रेस नेतृत्वाची भूमिका एकसंध आणि एकमुखी असेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यामुळे आता काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देणार की अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या माध्यमातूनच भाजपला आव्हान देणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!