व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठी जुळवाजुळव; संजय देशमुखांची खेळी यशस्वी!

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठी जुळवाजुळव; संजय देशमुखांची खेळी यशस्वी!

महायुतीच्या संचालकांच्या संख्याबळासोबत महाविकास आघाडीचीही साथ; राजकीय गणितांची जुळवाजुळव

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात यंदा केवळ संख्याबळ नव्हे, तर राजकीय संपर्क, पक्षश्रेष्ठींचे संकेत आणि पडद्यामागील सामंजस्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अध्यक्षपदासाठी खासदार संजय देशमुख यांनी केलेली राजकीय बांधणी अखेर यशस्वी ठरली. महायुतीतील घटक पक्षांमध्ये पदांचे वाटप निश्चित करताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देण्यात आले. विशेष म्हणजे, विरोधी गटाकडून उमेदवार देण्याच्या सुरुवातीच्या घोषणेनंतरही निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेभोवती झालेल्या राजकीय जुळवाजुळवीची चर्चा रंगू लागली आहे.

जिल्हा बँकेच्या २५ संचालकांच्या राजकीय समीकरणात शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसचे प्रत्येकी सात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, भाजपचे तीन, उद्धवसेनेचा एक आणि एक अपक्ष असे संख्याबळ आहे. महायुतीकडे १६ संचालकांचे पाठबळ असल्याने सत्तेची गणिते त्यांच्या बाजूने झुकलेली होती. मात्र, अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता कायम होती.

शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक संचालक असलेला घटक पक्ष असल्याने अध्यक्षपदावर या गटाने दावा केला. ज्येष्ठता आणि पक्षातील स्थान लक्षात घेता खासदार संजय देशमुख यांचे नाव पुढे आले. या पदासाठी मुंबईतील पक्षश्रेष्ठींकडून अनुकूल संकेत मिळाल्यानंतर देशमुख यांनी जिल्हास्तरावरही राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली. ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी त्यांनी महायुतीतील घटक पक्षांसह विरोधी गटातील संचालकांशीही संपर्क कायम ठेवल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर शेतकरी ठाम; आष्टीत महामार्ग रोखून सरकारला थेट आव्हान!

दरम्यान, उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिनिधित्व देण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे विजय जाधव यांनी उपाध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले. निर्धारित वेळेत प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने संजय देशमुख यांच्यासह तिघांचीही बिनविरोध निवड झाली.

महाविकास आघाडीने सुरुवातीला संख्याबळ कमी असतानाही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, पुढील घडामोडींमध्ये अपेक्षित उमेदवार अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या पाठिंब्याचा उल्लेख नवनिर्वाचित अध्यक्षांनीही केला. त्यामुळे या निवडीला केवळ महायुतीच्या संख्याबळाचा विजय मानण्याऐवजी व्यापक राजकीय सहमतीची किनार लाभल्याचे चित्र आहे.

वसंत साखर कारखाना प्रकरणाला नवे वळण; ४ नोव्हेंबरला सहकार मंत्र्यांसमोर सुनावणी!

निवडीनंतर संजय देशमुख यांनी बँकेचा वाढता एनपीए आणि दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा उल्लेख केला. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडून बँकेसाठी विशेष आर्थिक पॅकेज आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सत्तेची समीकरणे जुळविल्यानंतर आता बँकेची आर्थिक स्थिती सुधारणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे, हे नव्या नेतृत्वासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

error: Content is protected !!