
जिल्हा बँकेच्या सत्तेची धुरा हाती घेण्यासाठी महायुतीत हालचालींना वेग
Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणत सत्तांतराचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, निवडणुकीतील विजयापेक्षा आता बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांच्या हालचालींना वेग येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक आपल्या बंगल्यावर बोलाविली आहे. या बैठकीला प्रवीण देशमुख, विजय जाधव, विराज घुईखेडकर, नाना गाडबैले आणि महेश राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत बँकेतील पुढील राजकीय दिशा, सत्तेतील सहभाग आणि संचालकांमधील समन्वयाबाबत रणनीती आखली जाऊ शकते.
भाजपचे टेन्शन कायम, नागपूर पदवीधरसाठी थेट संघाचे दार ठोठावले!
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविलेल्या यशामुळे सत्तावाटपाच्या प्रक्रियेत पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे बँकेच्या कारभारात राष्ट्रवादीला किती वाटा मिळणार, तसेच इंद्रनील नाईक यांची पुढील रणनीती काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये अध्यक्षपद आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप कशा पद्धतीने होते, यावर आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहतील.
दुसरीकडे, शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक शनिवार किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री संजय राठोड सध्या जिल्ह्यात नसल्याने त्यांच्या परतल्यानंतर सत्तास्थापनेच्या विषयावर चर्चा होऊ शकते. निवडणुकीत शिंदेसेनेने आपली ताकद दाखविली असली, तरी बँकेच्या सत्तेची प्रत्यक्ष रचना कशी असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून मिळणारे संकेत आणि शिंदेसेनेच्या बैठकीत होणारी चर्चा या दोन्ही घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीतील घटक पक्ष परस्पर समन्वयातून सत्तेचे सूत्र निश्चित करतात की अध्यक्षपदाच्या दाव्यांमुळे नव्या राजकीय हालचाली सुरू होतात, याचे चित्र आगामी बैठकांनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर केल्यानंतर आता बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे जाणार, हा प्रश्न सहकार क्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.








