Youth Congress burns an effigy of Dhirendra Krishna Shastri at the protest site : नागपुरात संतापाचा वणवा; शिवरायांच्या अवमानाप्रकरणी आक्रमक
Nagpur छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथे शास्त्रींच्या कथेचा कार्यक्रम सुरू असतानाच, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज थेट कथास्थळी धडक देत धीरेंद्र शास्त्रींच्या पुतळ्याचे दहन केले. या आक्रमक आंदोलनामुळे आणि जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
धीरेंद्र शास्त्री यांनी एका विधानात म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून थकले होते, त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण राज्य समर्थ रामदास स्वामींकडे सोपवण्याची विनंती केली होती. शास्त्रींचा हा दावा शिवप्रेमी आणि इतिहासकारांनी पूर्णतः फेटाळून लावला असून, महाराजांच्या पराक्रमाचा हा अवमान असल्याचे म्हटले आहे.
Weather alert : एका बाजूला उष्णतेची तीव्र लाट, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा
या विधानानंतर शास्त्रींनी माफी मागितली असली, तरी शिवप्रेमींचा रोष कमी झालेला नाही. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शास्त्रींनी माफी मागितली असल्याने सर्वांनी संयम ठेवावा असे आवाहन केले आहे, मात्र युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत शास्त्रींच्या अटकेची मागणी केली आहे.
आज झालेल्या या आंदोलनात “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर सतीश चव्हाण, सचिव डॉ. मेहुल अडवाणी, नागपूर शहर काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे सरचिटणीस अभिजित ठाकरे आणि अतुल काका नाईक यांनी केले.
Prashant ambi : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून बुलढाण्यात तणाव
यासोबतच मध्य नागपूर युवा काँग्रेसचे आयुष राऊत, अमन लुटे, गोविंदा आजणकर, आयुष गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी शास्त्रींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. सध्या कथास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.








