Keep Ladki Bahin happy, but don’t touch our funds. Scheduled Caste Tribes organizations are aggressive : विधानसभा निवडणुकीपूर्वीही सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता
Nagpur : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रचंड लोकप्रिय ठरली. एकनाथ शिंदे सरकारने बहीणींना योजनेअंतर्गत १५०० रुपये देणे सुरू केले आणि सत्तेत आल्यावर रकमेत वाढ करून २१०० रुपये देऊ, अशी घोषणा केली. पण ही घोषणा हवेतच विरली. हा विषय मागील काळात शांत झाला होता. पण आता दुसऱ्या एका कारणाने लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
लाडक्या बहीणींना १५०० रुपये देण्यासाठी सरकारने अनुसूचित जाती, जमातीच्या समूहासाठी राखीव असलेला ७४८ कोटींचा निधी वळवला. त्यावरुन अनुसूचित जाती जमाती समूह संतप्त झाला आहे. आमच्या योजनांसाठी असलेला निधी का वळवला, असा प्रश्न करण्यात आला आहे. लाडक्या बहीणींचे लाड पुरवायचे आहेत तर पुरवा, आमची मनाई नाही. पण आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीला धक्का लाऊ नका, अशी मागणी केली गेली आहे.
७४६ कोटींचा निधी वळवल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीपूर्वीही सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता. आतापर्यंत जवळपास ७ हजार कोटींचा निधी वळवला गेला आहे. यावरून हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप अनुसूचित जाती जमातींच्या संघटनांकडून केला जात आहे.
गेल्या १० वर्षांत मागासवर्गीय विभागाला किती निधी मिळाला, त्यातील खर्च किती केला, शिल्लक किती राहिला कोणत्या कोणत्या योजनांवर किती खर्च झाला, कोणते प्रकल्प राबवले गेले, असे प्रश्न उपस्थित करत सरकारने यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी अनुसूचित जाती जमातींच्या संघटनांकडून करण्यात आली आहे.