Annasaheb Dange : 23 वर्षांनंतर अण्णासाहेब डांगे यांची भाजपमध्ये घरवापसी !

Senior leader returns in BJP after 23 years: पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे पाऊल

Mumbai : सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी अखेर 23 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डांगे यांच्यासह त्यांचे सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. डांगे कुटुंबाचा भाजप प्रवेश केवळ एक नेत्याचा पुनर्रप्रवेश नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

अण्णासाहेब डांगे हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर घडलेले नेते. त्यांनी शिवसेना-भाजप युतीत मंत्री म्हणून काम केलं होतं. 2002 साली पक्षात होणाऱ्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता. प्रमोद महाजन यांना पुढे आणण्यासाठी माझ्यावर अन्याय झाला,असे म्हणत त्यांनी तेव्हाचा मनस्ताप जाहीर केला होता. डांगे यांनी पक्ष सोडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जयंत पाटील यांचे ते निकटवर्ती मानले जात होते. मात्र, आता पुन्हा भाजपमध्ये पुनरागमन करताना त्यांनी जुन्या आठवणी, वेदना आणि अपेक्षांचा प्रकटपणे उल्लेख केला.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर !

या पक्षप्रवेश सोहळ्यात अण्णासाहेब डांगे यांच्या दोन्ही मुलांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. चिमण डांगे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा दिवस आम्हा कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आहे.बरेच वर्ष आम्ही याची वाट पाहत होतो. देवेंद्र फडणवीस यांनी आमचा विचार केला म्हणूनच आज आम्ही इथे आहोत.”तसेच त्यांनी आपल्या वडिलांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत आश्वासन दिलं की, “कधीही पक्षाशी गद्दारी होणार नाही.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी डांगे यांचे योगदान मोठ्या गौरवाने स्मरण करत म्हटले की, “अण्णांनी जनसंघाच्या काळापासून पक्षासाठी योगदान दिले आहे. टँकरमुक्त महाराष्ट्र अभियान असो की अन्य विकासकामं, अण्णांनी नेहमी पुढाकार घेतला.” त्यांनी आठवण सांगितली की, “मी महापौर असताना अण्णांसोबत काम करण्याची संधी मिळाली. माझे ‘संघ जीवन गाथा’ हे पुस्तक अण्णांनीच लिहिले.”डांगे कुटुंबाच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी संयमित पण स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “ज्यांना जायचं ते जातील, आणि ज्यांना थांबायचं ते माझ्याबरोबर राहतील,” असं सांगत त्यांनी पक्षातून होणाऱ्या गळतीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.

Happy Birthday Sudhir Mungantiwar : राजकारणातील स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व – सुधीरभाऊ

डांगे यांचा पक्षप्रवेश हा केवळ व्यक्तिगत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा डाव मानला जात आहे. डांगे हे धनगर समाजातील प्रभावशाली नेते असल्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आणि 2029 च्या दृष्टीने भाजप आपली पायाभूत ताकद मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
अण्णासाहेब डांगे यांचा 23 वर्षांनंतर भाजपमध्ये पुन्हा प्रवेश ही फक्त एक ‘घरवापसी’ नसून, महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय चित्राचा एक भाग आहे. हे पुनरागमन भाजपच्या विस्ताराच्या नव्या योजनेत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.