15 Sarpanch of Maharashtra invited to Independence Day celebration in Delhi : लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
New Delhi राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 सरपंचांचा समावेश असून यात 9 महिला सरपंच आहेत. 15 ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत.
केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.
Rahul Gandhi : “माझ्या जीवाला धोका” नेत्यांच्या धमक्यांचाही उल्लेख
महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच खालीलप्रमाणे आहेत : प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर), संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे), डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, ता. अकोला, जि. अकोला), नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे), सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम), अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली), संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया), रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा), सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी), प्रमोद किसन जगदाळे (बिदल, ता. मान, जि. सातारा), शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर) असे एकूण 15 सरपंच आहेत.
गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असून, यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. “आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित ‘सभा सार’ अॅप लाँच होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे.








